गृह खरेदीला सध्या अनुकूल वातावरण; सवलतींमुळे वाढले व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 03:36 AM2020-11-01T03:36:08+5:302020-11-01T03:36:26+5:30
Mumbai : रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार संस्था ॲनरॉक प्रॉपर्टीज यांनी देशातील सात प्रमुख शहरांतील बाजारपेठेतील विद्यमान परिस्थिती आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षण अहवालात हे निरीक्षण मांडले.
मुंबई : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेली कपात आणि विकासकांना दिलेल्या सवलतींमुळे घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढू लागले असून, ऑक्टोबर ते डिसेंबर या उत्सवी काळात गेल्या तिमाहीच्या तुलनेत ३६ टक्के जास्त घरांची विक्री होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या तिमाहीत मुंबई महानगर क्षेत्रात ९३०० घरांची विक्री झाली होती. ती या तिमाहीत १२,६०० पेक्षाही पुढे पोहोचेल असा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत दोन तिमाहीत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार संस्था ॲनरॉक प्रॉपर्टीज यांनी देशातील सात प्रमुख शहरांतील बाजारपेठेतील विद्यमान परिस्थिती आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षण अहवालात हे निरीक्षण मांडले.
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालखंडात २०१५मध्ये मुंबई आणि पुण्यातील घरांच्या विक्रीत ३० टक्के वाढ नोंदविली होती. २०१८ आणि २०१९ मध्ये ७ ते ११ टक्के वाढ झाली होती. मात्र, त्या दरम्यानच्या २०१६ आणि २०१७ मध्ये नोटबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे उत्सवी काळातही घरांच्या विक्रीत घट झाली होती. मुंबईत ती घट जवळपास ३५ टक्के होती. यंदा सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिली. विकासकांनी विविध सवलती जाहीर केल्या. गृहकर्जही कधी नव्हे एवढे स्वस्त झाले. त्यामुळे घरांच्या किमती ७ ते १५ टक्क्यांनी कमी झाल्याने त्यांच्या खरेदीकडे लोकांचा ओढा वाढत असल्याची माहिती ॲनरॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिली.
जुलै ते सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर ते डिसेंबर या
कालावधीत झालेली वाढ (टक्क्यांमध्ये)
शहर २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९ २०२०
मुंबई ३० ३५ १५ ११ ७ ३६
पुणे ३० ३७ १८ ७ १० ३४
दिल्ली १३ ५९ २३ १२ ९ ३१
बंगळूरु ८ ४१ २१ ९ ७ ३५
हैदराबाद १२ ६३ २२ ३ ६ २१
चेन्नई ५ ५७ ३५ १२ ६ २२
कोलकाता १८ ५८ ३० १० ४ ३०
एकूण ३ ४७ २१ ४ ७ ३३
(अपेक्षित)