मुख्याध्यापक संघटनेची मागणी : अभ्यासक्रमाला पुरेसा वेळ मिळणार नसल्याचे म्हणणे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे आकलन आणि अध्यापन करण्यास कमी वेळ मिळणार असल्याने शिक्षण विभागाकडून यंदाच्या सर्वच इयत्तांच्या अभ्यासक्रमात २५ ते ३० टक्के कपात करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेकडून होत आहे.
राज्यात तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, यंदा विद्यार्थ्यांचा सेतू उजळणी अभ्यासक्रमच १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे आणि त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू होईल. त्यातच ऑनलाईन शिक्षणासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही अद्याप शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या नाहीत. अशा परिस्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी शिक्षकांना कमी वेळ मिळणार आहे.
दि. १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली असली, तरी सर्वच ठिकाणी लगेच शाळा सुरू होण्याची शक्यता नाही. अशावेळी ऑनलाईन शिक्षणामुळे साहजिकच रोजच्या तासिका कमी झाल्या आहेत. प्रत्येक विषयाला वेळ मिळून त्याच्या शिकवण्या प्रत्येक शिक्षकाला घेता याव्यात. या नियोजनात विषयाच्या अभ्यासक्रमाला पूर्ण करण्यासाठी कमी वेळ मिळणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या आणि परीक्षा नियोजनाच्या संदर्भात राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वच संभ्रमात असल्याने मंडळाने लवकर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांप्रमाणे अभ्यासक्रम आणि मूल्यमापन आराखडा वेळेत जाहीर करावा म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास आणि शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ होईल. शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या वार्षिक नियोजनाला याची मदत होऊ शकेल.
- पांडुरंग केंगार, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना.