खलील गिरकर
मुंबई : आता पर्यंत केवळ इस्लामचे धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांमधील अभ्यासक्रमाला आता तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांची जोड देण्याचा निर्णय घेतला जात आहे. सध्या मदरशांमध्ये इस्लामिक अभ्यासक्रम व काही ठिकाणी जगाची भाषा म्हणून इंंग्रजी भाषा शिकवली जाते, काही मदरशांमध्ये संगणकाचे शिक्षण दिले जाते. मात्र आगामी काळात मदरशांमधील विद्यार्थ्यांना केवळ इस्लामिक शिक्षण देऊन चालणार नाही तर त्यांना जगाच्या बाजारात इतर व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण देणे गरजेचे आहे यावर मौलानांचे मतैक्य झाले आहे.
मदरसा जामिया काद्रिया अश्रफियाचे प्रमुख व मुस्लिम समाजातील प्रभावशाली धर्मगुरु मौलाना हजरत मोईनुद्दीन अश्रफ यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्ग दर्शन का खालील विविध मदरशांमध्ये सुमारे दोन हजार पेक्षा अधिक मुले व मुली शिकतात. त्यांना यापुढील काळात केवळ इस्लामिक शिक्षण देण्याऐवजी त्यासोबत तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. मदरशांमधून विविध इस्लामिक पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना उपजीविकेसाठी केवळ मशीद व मदरशांवर अवलंबून राहावे लागणार नाही तर त्यांच्या हातात योग्य प्रकारे पैसा कमावण्यासाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाने जगातील विविध बाबींमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. कोरोनानंतरचे जग हे पूर्वीप्रमाणे नसेल तर विविध बाबींचे आयाम बदललेले असणार आहेत. याचा विचार करुन पुढील काळात बदललेल्या परिस्थितीत या विद्यार्थ्यांना जीवन जगताना हाताशी अनेक पर्याय उपलब्ध राहतील याकडे आम्ही लक्ष देत असल्याची माहिती मौलाना अश्रफ यांनी दिली. इस्लाममध्ये शिक्षणाचे मोठे महत्व आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना इस्लामिक शिक्षणासोबत जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले इतर शिक्षण देऊन दीन (धार्मिक) व दुनिया या दोन्हींचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.