अक्षय चोरगेमुंबई : दक्षिण मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे ‘करी रोड’. लालबाग, वरळी, लोअर परळ या भागांमध्ये कामानिमित्त लाखोंच्या संख्येने या स्टेशनवर रेल्वे प्रवाशांची वर्दळ असते. सकाळी आणि सायंकाळी स्थानकावर गर्दी उसळते. तथापि, रेल्वेस्थानकावर ये-जा करण्यासाठी फक्त एकच पूल असल्याने पुलावर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रोजच अभूतपूर्व कोंडीचा प्रसंग उभा राहतो. या पुलासाठी पालिकेकडून सुमारे दीड कोटींचा निधी आठ वर्षांपूर्वी देण्यात आला, तरीही हे काम मार्गी लागलेले नाही, हे दुर्दैव.करी रोड रेल्वे स्थानक आणि पूल ब्रिटिशकालीन आहे. हा पूल अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. स्थानकावर ये-जा करण्यासाठी हा एकमेव पूल असून, या पुलावरून बाहेर पडण्यासाठीही एकच चिंचोळी वाट आहे. त्यामुळे महिलांना आणि ज्येष्ठांना अधिक त्रास होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. धक्काबुक्की, चेंगराचेंगरी, छेडछाड, चोरीचे प्रकार गर्दीमुळे घडतात. मुंबईत मेट्रो आणि बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे. परंतु मुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत प्रवाशांनीव्यक्त केली.गणेशोत्सवातरोज २० तास गर्दीलालबागपासून जवळचे रेल्वेस्थानक म्हणजे करी रोड. गणेशोत्सवात दहा ते अकरा दिवस लालबागमध्ये मुंबईसह देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे रात्रंदिवसया रेल्वेस्थानकावर गर्दी असते. या दिवसांत या स्थानकावर रोजच धक्काबुक्की होते. त्यामुळे एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही.रेल्वे लक्ष देईना!करी रोड रेल्वे स्थानकात प्रवाशांचे हाल होतात. गर्दी, चोरी आणि महिलांना अनेक घाणेरड्या प्रकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे २००३ सालापासून सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे नव्या पुलाची आणि सध्या अस्तित्वात असलेल्या पुलाच्या रुंदीकरणाची मागणी प्रवासी करत आहेत. मात्र, रेल्वेने सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक नगरसेविका असल्याने माझ्याकडेही अनेकांनी पत्रे पाठविली. पैकी निवडक पत्रे मी रेल्वे प्रशासनाला दिली. तरीही रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.- किशोरी पेडणेकर, नगरसेविकारेल्वे प्रशासन निरुत्साहीना. म. जोशी मार्गावरील महाराष्टÑ हायस्कूलपर्यंत २५ मीटरचा पूल बांधावा, अशी मागणी रेल्वेकडे सातत्याने करण्यात आली, परंतु रेल्वेकडे पैसे नसल्याने पालिकेने २००८ साली दीड ते पावणे दोन कोटी रुपये मंजूर केले व २०१२ पर्यंत पूर्ण रक्कम रेल्वेकडे पालिकेने सुपुर्द केले. सातत्याने पाठपुरावा करून, अखेर एप्रिल २०१६ साली रेल्वेने भूमिपूजन केले. आता दीड वर्ष उलटले, तरी फक्त ४० टक्के काम झाले आहे. स्थानकाच्या दक्षिणेला अजून एका पुलाची मागणी केली आहे. पण रेल्वे प्रशासन निरुत्साही असल्याचे जाणवते.- अरविंद सावंत, स्थानिक खासदारनवा पूल हवास्थानकावर सकाळी आणि रात्री खूप गर्दी असते. पुलावरून बाहेर लालबागकडे जाण्यासाठी चिंचोळी वाट आहे. त्यामुळे नव्या पुलाची आवश्यकता आहे. सध्याच्या पुलाचे रुंदीकरणही व्हावे.- शांताराम भोसले, प्रवासीचोरीच्या घटनाएकच पूल असल्यामुळे पुलावर मोठी गर्दी होते. अनेकदा गर्दीचा फायदा घेत, चोरीच्या घटनाही घडतात.- अन्वर अन्सारी, प्रवासीकाम रखडलेनव्या पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. जो पूल अस्तित्वात आहे, तो ब्रिटिशकालीन आहे. येथे दुर्घटना होण्याची शक्यता अधिक आहे.- मुकेश शेट्टे, प्रवासीपुनर्विकासाबाबत उदासीनताकरी रोड रेल्वे स्थानकाची दुरवस्था झालेली आहे.गेल्या कित्येक दशकांपासून स्थानकाचा पुनर्विकास झालेला नाही. एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर मंगळवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापकीय कार्यालयातून करी रोड स्थानकाचेही सर्वेक्षण करण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.२५ मीटरचा पूल बांधायला दीड वर्षेकरी रोड रेल्वे स्थानकापासून शेजारी असलेल्या ना. म. जोशी मार्गापर्यंतच्या पुलाच्या कामाचा शुभारंभ एप्रिल २०१६ मध्ये माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दीड वर्षे उलटूनही हा पूल अजून तयार झालेला नाही. जेमतेम २५ मीटर लांबीचा पूल बांधायला इतका कालावधी लागतो का? असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.सातत्याने पाठपुरावा२००७ साली करी रोड विभागात मी नगरसेवक होतो. तेव्हापासून रेल्वेकडे ‘फूटओव्हर ब्रिज’ची मागणी करत आहे. अद्याप हा पूल बांधलेला नाही. रेल्वेकडे पूल बांधायला पैसे नसल्याने, २००८ साली महापालिका आयुक्तांकडून पुलासाठी सुमारे दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मंजुरीनंतर वर्षभरात ६० लाख रुपयांचे दोन हप्ते रेल्वेला देण्यात आले. त्यानंतर, वर्षभरात उरलेले पैसेसुद्धा दिले. तरीदेखील २०१४ पर्यंत रेल्वेकडून कोणत्याही प्रकारचे कामाचे आदेश देण्यात आले नाहीत. त्यानंतर, पुन्हा या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यामुळे २०१६ साली कामाचे फक्त भूमिपूजन करण्यात आले.- सुनील शिंदे, आमदार
करी रोडचा पूल ‘लटकलेला’च!, आठ वर्षांपूर्वीच मिळाला निधी, तरीही काम अपूण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 5:17 AM