करी रोड, एल्फिन्स्टन उड्डाणपुलावर एकेरी वाहतूक; वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:41 AM2018-06-04T02:41:01+5:302018-06-04T02:41:01+5:30
करी रोड आणि एल्फिन्स्टन उड्डाणपुलावरील वाहतूक १ जूनपासून एकेरी करण्याचा निर्णय वाहतूक पोलीस कक्षाने घेतला. मात्र करी रोड, परळ आणि लोअर परळ परिसरातील सर्व मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे फसला.
मुंबई : करी रोड आणि एल्फिन्स्टन उड्डाणपुलावरील वाहतूक १ जूनपासून एकेरी करण्याचा निर्णय वाहतूक पोलीस कक्षाने घेतला. मात्र करी रोड, परळ आणि लोअर परळ परिसरातील सर्व मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे फसला. स्थानिकांना होणाऱ्या त्रासामुळे शिवसेना मैदानात उतरली आहे. वाहतूक पूर्ववत न केल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला.
करी रोड उड्डाणपुलावरून पूर्वेकडून पश्चिमेला जाणारा मार्ग एकेरी केला आहे. त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेला जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. एल्फिन्स्टन रोडवरून पश्चिमेकडून पूर्वेला जाणारा एकेरी मार्ग सुरू केला. परिणामी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वेला आणि पश्चिमेला जाण्यासाठी वळसा मारावा लागत आहे. करी रोड आणि परळच्या मध्यभागी मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे एकेरी वाहतुकीचा निर्णय वाहतूक प्रशासनाने घेतल्यामुळे येथील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक प्रशासनाने घेतलेला निर्णय हा येथील पश्चिमेकडील मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
शिवसेना शिवडी विधानसभेचे उपविभागप्रमुख गजानन चव्हाण यासंदर्भात म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे उड्डाणपूल आहेत. सतत निर्माण होणारी वाढीव वस्ती, वाढणाºया गाड्या याचा अंदाज घेऊन राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा तोडगा काढलेला नाही. चिंचपोकळी, करी रोड आणि एल्फिन्स्टन येथील उड्डाणपुलावर उद्या कोणत्याही प्रकारचा प्रसंग ओढावला तर सरकारने पर्यायी व्यवस्था कुठे केली आहे? पश्चिमेकडे कॉर्पोरेट आॅफिसांना चांगल्या सोयी पुरवण्यासाठी वाहतूक बदलण्याचा घाट घालण्यात आला. पूर्वेला मोठमोठी रुग्णालये, महाविद्यालये आणि शाळा आहेत. मात्र तेथे जाण्याचा रस्ता बंद केला जातो. एकेरी वाहतूक विरोधी आता शिवसेना सह्यांची मोहीम घेणार आहे. तसेच दुहेरी वाहतूक सुरू झाली नाही तर पुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल.