मुंबई : करी रोड आणि एल्फिन्स्टन उड्डाणपुलावरील वाहतूक १ जून २०१८ पासून एकेरी करण्याचा निर्णय पोलीस वाहतूक नियंत्रण कक्षाने घेतला. मात्र निर्णयाच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी करी रोड, परळ आणि लोअर परळ परिसरातील सर्व मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाल्याने या निर्णयाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. वाहनचालकांपर्यंत निर्णयाची पुरेशी माहिती पोहोचली नसल्याने कोंडी झाल्याचे कारण वाहतूक विभागाने दिले आहे. मात्र ढिसाळ नियोजनामुळे सकाळपासून प्रचंड मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागला.याआधी वाहतूक विभागाने करी रोड पुलावर शिंगटे मास्तर चौक ते भारतमाता जंक्शनकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे करी रोड पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाºया वाहनांसाठी उड्डाणपुलाचा वापर मर्यादित केला गेला. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाºया वाहनांना चिंचपोकळी आणि एल्फिन्स्टन उड्डाणपुलाचा मार्ग उपलब्ध करून दिला. तर, दुहेरी वाहतूक असलेल्या एल्फिन्स्टन उड्डाणपुलावरील वाहतूकही एकेरी करण्यात आली. एल्फिन्स्टन पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाºया वाहनांना प्रवेशबंदी करत प्रशासनाने केवळ पश्चिमेकडून पूर्वेकडे येणाºया वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल खुला ठेवला आहे.याबाबत वाहनचालक अनभिज्ञ असल्याने एल्फिन्स्टन उड्डाणपुलावरून पश्चिमेकडे जाणाºया वाहनांच्या लांब रांगा डॉ. आंबेडकर मार्गावर तर करी रोड उड्डाणपुलावरून पूर्वेकडे जाता येत नसल्याने ना.म. जोशी मार्ग आणि लोअर परळ उड्डाणपुलावर रांगा लागल्या. उड्डाणपुलाच्या तोंडाशी आल्यानंतर चालकांना पुलावर एकेरी वाहतूक सुरू झाल्याची माहिती मिळत होती. त्यामुळे एक ते दोन किलोमीटर फिरून जाण्याची वेळ चालकांवर आली. एरव्ही १५ ते ३० मिनिटांत होणाºया प्रवासासाठी प्रवाशांना एक ते दीड तास खर्च करावा लागला.प्रयोग चांगला, पण...भविष्यात ना.म. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्या वेळी याच मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची शक्यता आहे. त्यामुळे आताच वाहतूक मार्गांत बदल करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वाहतूक विभागाने घेतलेला हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. मात्र पहिल्याच दिवशी नागरिकांपर्यंत या निर्णयाची योग्य माहिती पोहोचली नसल्याने अंमलबजावणीवेळी वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवल्याची माहिती वाहतूक पोलीस देत आहेत.या मार्गाने प्रवास करापरेल टीटी जंक्शन येथून संत रोहिदास चौकाकडे जाणारी वाहतूक परले टीटी येथून डॉ. आंबेडकर मार्गाने भारतमाता सिनेमा-महादेव पालन मार्ग-शिंगटे मास्तर चौक-एनएम जोशी मार्गाने सेनापती बापट मार्गाने संत रोहिदास चौक येथे येतील.शिंगटे मास्तर चौककडून सिनेमा जंक्शनकडे जाणारी वाहतूक सेनापती बापट मार्गे संत रोहिदास चौक येथून उजवे वळण घेत एल्फिन्स्टन पूलावरुन परेल टीटी जंक्शन येथे जाईल.शिंगटे मास्तर चौक येथून भारतमाता जंक्शनकडे जाणारी वाहतूक एनएम जोशी मार्गाने डावे वळण घेत साने गुरुजी मार्गाने संत जगनाडे महाराज चौकातून डावे वळण घेत भारतमाता जंक्शनकडे जाता येईल.वाहतूक विभागाचा हा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यासाठी सह्यांची मोहीम घेत मनसेने प्रशासनाचा निषेधही नोंदवला आहे.स्थानिक जनतेला या निर्णयाचा नाहक त्रास होत असल्याचे मनसेचे विभागाध्यक्ष नंदू चिले यांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे लोअर परळ विभागातील धनाढ्यांच्या फायद्यासाठी स्थानिक गोरगरिबांना वेठीस धरणारा हा निर्णय असल्याचा गंभीर आरोपही मनसेने केला आहे. तरी प्रशासनाने निर्णय रद्द केला नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेचे शाखाध्यक्ष मारुती दळवी यांनी दिला आहे.
करी रोड, एल्फिन्स्टन पुलावर वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 4:47 AM