मुंबई : वडाळा ते जेकब सर्कल या मोनोच्या दुसऱ्या टप्प्यातील करी रोड स्थानकाजवळील मोनो रेलचा २५0 टनाचा गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामामुळे मार्च महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद केलेला करी रोड उड्डाणपूल येत्या दोन दिवसांत पूर्ववत करण्यात येणार आहे, तर डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होऊन मार्चमध्ये मोनो धावेल, असा दावा एमएमआरडीए अधिकारी करत आहेत.मिंट कॉलनी आणि लोअर परेल स्टेशनला जोडणाऱ्या मोनोच्या स्टील गर्डरचे काम रविवारी पूर्ण करण्यात आले. या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परेल किंवा चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागत होता. गर्डरचे काम पूर्ण झाले असले तरी गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वे मार्गामध्ये काही ठिकाणी सपोर्ट उभारण्यात आले होते. ते सपोर्ट काढण्याचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेमार्फत पुलाची पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतरच या वाहतूक सुरू करण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या सूत्रांनी सांगितले.करी रोड उड्डाणपुलाजवळील मोनोच्या स्टील ब्रिजमुळे महत्त्वाचे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे मोनो रेल्वे स्टेशनची कामे, रूळ आणि सिग्नल यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर मार्चमध्ये मोनो धावेल, असा विश्वास एमएमआरडीएचे अधिकारी व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)
करी रोड उड्डाणपूल रविवारी खुला होणार ?
By admin | Published: September 12, 2015 3:51 AM