अनधिकृत बांधकामांचा शाप लाभलेला प्रभाग
By admin | Published: February 10, 2015 10:37 PM2015-02-10T22:37:29+5:302015-02-10T22:37:29+5:30
नालासोपारा शहरात असलेल्या या प्रभागाला अनधिकृत बांधकामाचा शाप लाभला आहे. या प्रभागातील हनुमान नगर हा संपूर्ण परिसर अनधिकृत बांधकामासाठी कुप्रसिद्ध आहे.
वसई : नालासोपारा शहरात असलेल्या या प्रभागाला अनधिकृत बांधकामाचा शाप लाभला आहे. या प्रभागातील हनुमान नगर हा संपूर्ण परिसर अनधिकृत बांधकामासाठी कुप्रसिद्ध आहे.
दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने या भागात जोरदार मोहिम राबवली होती. अनेक बांधकामे उद्ध्वस्त केल्यानंतरही पुन्हा तेथे अनधिकृत बांधकामे उभी राहिली. येथून निवडून आलेल्या नगरसेवकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने या भागात अनधिकृत बांधकामाचे अक्षरश: पीक आले आहे.
प्रभाग क्र. ३८ मध्ये प्रामुख्याने एस.टी डेपो परिसर, चक्रधर नगर, अर्धा हनुमान नगर, पांचाळनगर व अमीपार्क इ. चा समावेश आहे. परंतु येथील विकासकामांकडे स्थानिक नगरसेवकाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरीकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. नगरसेवकाचा जनसंपर्क नसल्यामुळे येथे नागरीकांच्या दैनंदिन अडचणी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. रस्ते, गटारांची कामेही या प्रभागात झाल्याचे दिसत नाहीत. पाण्याचा प्रश्नही अत्यंत बिकट झाला असून नागरीक दर उन्हाळ्यात पाणीटंचाईने हवालदिल होत असतात. या परिसरात उन्हाळ्यामध्ये २ ते ३ दिवसाने एकदा पाणी येते परंतु याबाबत नगरसेवकाने कधीही आवाज उठवला नाही. त्यामुळे नगरसेवक अनिल भोगले यांच्याबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. भोगले यांच्या निष्क्रीयतेचा पुढील निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.