मुलीला नाकारणारे आईवडील कोठडीत
By admin | Published: December 12, 2015 02:07 AM2015-12-12T02:07:21+5:302015-12-12T02:07:21+5:30
दुसरीसुद्धा मुलगीच झाल्याने तिला कचराकुंडीत फेकून देणाऱ्या साहू दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
मुंबई : दुसरीसुद्धा मुलगीच झाल्याने तिला कचराकुंडीत फेकून देणाऱ्या साहू दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. जगन्नाथ साहू आणि सपना साहू असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.
मुलुंड पश्चिमेकडील इंदिरा नगर २ मध्ये साहू कुटुंबीय राहण्यास आहे. दुसरीसुद्धा मुलगीच झाल्याने साहू दाम्पत्याने ५ नोव्हेंबर रोजी या चिमुरडीला अपना बाजार येथील कचराकुंडीत फेकून दिले होते. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांनाही घरातून बाहेर काढले. त्यानंतर कल्याण परिसरात भाड्याच्या खोलीमध्ये हे दाम्पत्य राहण्यास होते. महिनाभरानंतर हा प्रकार उघडकीस येताच मुलुंड पोलिसांनी साहू दाम्पत्याला गुरुवारी अटक केली.
शुक्रवारी न्यायालयाने दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चिमुरडीची आणि साहू दाम्पत्याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. अटकेनंतरही या निर्दयी आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आपण केलेल्या कृत्याबद्दल पश्चात्तापाची भावना दिसून आली नाही. मुलीला या दाम्पत्याकडे सोपवायचे की नाही? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून पुढील कार्यवाही कायद्याप्रमाणे होईल, अशी माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)