प्रभाग समित्या ‘पहारेकऱ्यां’च्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:55 AM2018-04-14T02:55:06+5:302018-04-14T02:55:06+5:30
मनसेतील सहा नगरसेवकांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचे तुल्यबळ चांगलेच वाढल्याने भाजपाच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही संपुष्टात आल्या आहेत.
मुंबई : मनसेतील सहा नगरसेवकांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचे तुल्यबळ चांगलेच वाढल्याने भाजपाच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही संपुष्टात आल्या आहेत. मात्र, प्रभाग समित्यांमधील अंडरस्टँडिंगमुळे पहारेक-यांनाही सत्तेची मलई चाखता येणार आहे. एवढेच नव्हे, तर दुसरा मोठा पक्ष असल्याने भाजपाला १७पैकी नऊ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळविता आले आहे.
महापालिकेच्या सन २०१८-१९करिता १७ प्रभाग समित्यांपैकी १६ प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका गेल्या दोन दिवसांत पार पडल्या. गेल्या वर्षी शिवसेनेच्या पाठिंब्यावर मनसेला एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळविता आले होते. तर आठ प्रभाग समित्या भाजपाकडे होत्या. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला एक प्रभाग समिती मिळविता आली आहे. संख्याबळानुसार शिवसेना भाजपाने प्रभाग समित्या सोडल्या असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
आज झालेल्या आठ प्रभागांच्या निवडणुकीत जी/उत्तरमध्ये शिवसेनेच्या मरिअम्माल मुथुरामलिंगाम थेवर, एच/पूर्व आणि एच/पश्चिम प्रभाग समितीवर शिवसेनेचे सदानंद परब, के/पूर्व प्रभाग समितीवर भाजपाचे सुनील यादव, के/पश्चिम प्रभाग समितीवर भाजपाचे योगीराज दाभाडकर, एल प्रभाग समितीवर शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार किरण लांडगे, एम/पश्चिम प्रभाग समितीवर भाजपाचे राजेश ओमप्रकाश फुलवारीया, एन प्रभाग समितीवर शिवसेनेच्या रूपाली आवळे तर एस आणि टी प्रभाग
समितीवर भाजपाच्या सारिका मंगेश पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
>प्रभाग समित्यांमधील अंडरस्टँडिंगमुळे पहारेकºयांनाही सत्तेची मलई चाखता येणार आहे. एवढेच नव्हे, तर दुसरा मोठा पक्ष असल्याने भाजपाला १७पैकी नऊ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळविता आले आहे. गेल्या वर्षी शिवसेनेच्या पाठिंब्यावर मनसेला एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळविता आले होते. तर आठ प्रभाग समित्या भाजपाकडे होत्या. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला एक प्रभाग समिती मिळविता आली आहे.