मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पाणीपुरीवाल्याचा मृत्यू झाला आहे. या पाणीपुरीवाल्याच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी ग्राहकांनी पुढाकार घेतला आहे. ग्राहकांनी कुटुंबाच्या मदतीसाठी ५ लाख रुपये जमवण्याचा निर्धार केला असून २४ तासांतच ७९ जणांकडून १.४५ लाख रुपये जमाही झाले आहेत. दक्षिण मुंबईतील नेपियन सी रोडवरील पाणीपुरी विक्रेते भगवती यादव हे मधुमेहाचे रुग्ण होते. कोरोनाचे निदान झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण शर्करा प्रमाण अत्यंत खालावल्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांचा मृत्यू झाला.भगवती यादव यांच्या मुलीने सांगितले की, वडील दवाखान्यात असताना त्यांच्या ग्राहकांकडून अनेक फोन आले. आई आणि वडिलांनी तयार केलेल्या पाणीपुरीचे चाहते ग्राहक सध्या दिल्ली, दुबई आणि अमेरिकेतही आहेत, असे या मुलीने सांगितले. भगवती यादव यांची मुलगी आणि पत्नी अंत्यसंस्कारानंतर आझमगडमध्ये आहेत. कमाईचा एकमेव स्रोत गमावल्यानंतर कुटुंब आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कुसुमने ग्राहकांचे आभार मानले आहेत.गेल्या ४६ वर्षांपासून त्यांनी ग्राहकांची सेवा केली. दररोज सकाळी ६ वाजता पुरी तयार करणे आणि ग्राहकांसाठी बाटलीतील पाणी वापरणे यामुळे ते अधिक प्रसिद्ध होते. भगवती यांना बिस्लेरी पाणीपुरी मॅन असे म्हणून ओळखले जात होते. भगवती यादव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांच्या ग्राहकांनी पुढाकार घेतला आहेत. यादव यांचे नियमित ग्राहक गिरीश अग्रवाल यांनी सांगितले, ‘आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे पाणीपुरी खाण्यासाठी यायचो. त्यांच्याकडील दही बटाटापुरी आणि पाणीपुरी प्रसिद्ध होती. दररोज सायंकाळी ते न चुकता त्यांच्या जागेवर यायचे. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो, त्यांनी ग्राहकांची सेवा करण्याचा नियम कधीही चुकवला नाही.
मृत पाणीपुरीवाल्याच्या कुटुंबीयांना ग्राहकांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 1:44 AM