विजेच्या जास्त वापरासह विविध आकारांमुळे मोडले ग्राहकांचे कंबरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:01 AM2020-06-25T05:01:36+5:302020-06-25T05:01:40+5:30
महावितरणच्या वीज ग्राहकांना अधिकची वीजबिले आली आहेत, अशी माहिती वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. तर वाढीव बिलाची समस्या असल्यास तपासणीअंती दुरुस्त करून देण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
मुंबई : उन्हाळा, विजेचा जास्त वापर आणि वीज आकार, स्थिर आकार व वहन आकार यात झालेल्या वाढीचा फटका म्हणून जून महिन्यात महावितरणच्या वीज ग्राहकांना अधिकची वीजबिले आली आहेत, अशी माहिती वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. तर वाढीव बिलाची समस्या असल्यास तपासणीअंती दुरुस्त करून देण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही. जूनमध्ये देण्यात येत असलेली वीजबिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच आहेत. त्याची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने विशेष लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतरही काही शंका असल्यास ग्राहक आवश्यकतेनुसार https://billcal.mahadiscom.in/consumerbill/या लिंकवरून वाढीव वीजबिलांची पडताळणी करू शकतात. तसेच महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल. ग्राहकांना मीटर रीडिंग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येणार आहे.
वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी वीजदरवाढीबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, महावितरणने मार्चमध्ये प्रत्यक्षात वीजबिले दिली. एप्रिल आणि मे महिन्यात वीजबिले आॅनलाइन देण्यात आली. त्यानंतर जूनमध्ये प्रत्यक्षात वीजबिले हातात आली. एप्रिल आणि मे महिन्यात जी बिले काढण्यात आली ती गेल्या तीन महिन्यांतील सरासरीच्या आधारे काढली. ती बिले कमी होती. आता ज्यांनी ती भरली आहेत त्यांच्या वीजबिलातून रक्कम वजा होत आहे. ज्यांनी बिले भरली नाहीत; त्यांच्या बिलात ही रक्कम थकबाकी म्हणून दिसत आहे.
>यामुळे वाढले बिल
मार्च महिन्यात जुना दर, एप्रिल महिन्यात नवा दर आणि मे महिन्यात नवा दर; या पद्धतीने बिले काढण्यात आली. वीजबिल वाढीला दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे मागील सरासरी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या हिवाळी महिन्यातील होती. तेव्हा लोक घराबाहेर होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे या काळात लॉकडाऊन असल्याने घरात होते. शिवाय उन्हाळा होता. परिणामी, विजेचा वापर वाढला.
तिसरे म्हणजे दरवाढ. या दरवाढीत स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकार वाढल्याने वीज दरात वाढ झाली. वाढीव दराचे सव्वा ते अडीच महिने आहेत आणि कमी दराचा अर्धा महिना किंवा वीस दिवस आहेत, असेही होगाडे यांनी सांगितले आहे.