मुंबई : केकची ऑर्डर दिलेल्या ग्राहकानेच डिलिव्हरी बॉयची दुचाकी पळविल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी कांदिवली परिसरात घडला आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करत, त्याचा शोध सुरू केला आहे.
कांदिवली पूर्व परिसरात असलेल्या हनुमाननगरमध्ये हे केक शॉप आहे. त्या ठिकाणी एक व्यक्ती त्याच्या भाचीचा वाढदिवस असून, त्यासाठी केक बुक करायचा आहे, असे सांगत आली, तसेच आकुर्ली रोड परिसरात असलेल्या इमारतीत तो पाठवून देण्यासही त्याने सांगितले. ही ऑर्डर ओमकार मोहिते (२३) या शॉपमधील कर्मचाऱ्याने बुक केली. त्यानंतर, त्याच्या एका सहकाऱ्यासोबत तो केक पोहोचविण्यासाठी तिथे पोहोचला. त्यावेळी केक बुकिंगसाठी आलेला इसम त्यांना त्याच ठिकाणी सापडला. त्याने मोहितेकडे मिठाई आणण्यासाठी त्याची मोटरसायकल मागितली.
मात्र, मोहितेने देण्यास नकार दिला. तेव्हा त्याच्या सहकाऱ्याला सोबत घेऊन जातो, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे मोहितेने तयारी दाखविली. त्यानुसार, ती व्यक्ती मोहितेच्या सहकाऱ्यासह मिठाईच्या दुकानात ऑर्डर देऊन आली. जवळच असलेल्या इस्त्रीच्या दुकानातून कपडे घेऊन येतो, असे त्याला सांगत, अखेर मोटरसायकल घेऊन पसार झाली. ही बाब केक कर्मचाऱ्याच्या लक्षात आली आणि त्याने घडला प्रकार मोहितेला सांगितला. मोहितेने समतानगर पोलिसात धाव घेत, या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलीस मोटरसायकल चोराचा शोध घेत आहेत.