मुंबई : भाजीपाला स्वस्त असो किंवा महाग ग्राहक तोलूनमापूनच घेताे. मात्र, दुसरीकडे पेट्रोल, डिझेल घेताना दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. पेट्रोल पंपावर गेल्यानंतर काही ग्राहक तर पैसे देऊन सेल्स ऑफिसरला पेट्रोल किंवा डिझेल गाडीत भरायला सांगतात. ग्राहक पेट्रोल भरताना लक्षही देत नाही. तसेच पेट्रोलपंपावर मोफत मिळणाऱ्या सुविधांबाबत ग्राहक अनभिज्ञ आहेत. पंप चालकांकडून मोफत हवा, पाणी अथवा शौचालयाचीही व्यवस्था असते. पण, त्याकडे ग्राहकांकडून दुर्लक्ष केले जाते. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत जवळपास २२४ पेट्रोल पंप येतात. वाहनांची ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे. कोरोना काळात तर वाहन खरेदी खूप वाढली आहे. शहरात दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पेट्रोलची विक्री अधिक आहे. लाॅकडाऊनमध्ये पेट्रोल, डिझेल विक्रीलाही फटका बसला आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेलच्या मापात पाप करणारे अनेक जण आजही आहेत, परंतु ग्राहकही त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत, असे चित्र आहे. मागील वर्षभरात शहरातील एकाही पेट्रोल पंपासंदर्भात वैधमापन विभागाकडे लेखी तक्रार आलेली नाही, तर वजन व मापे तपासणी कार्यालयाकडून वर्षभरातून एकदा पंपाची रितसर तपासणी केली जाते, त्याशिवाय त्यांचे ऑडिट होत नसल्याचे सांगण्यात येते. सदर तपासणी करताना पंप मालक, सेल्स ऑफिसर, फिटर आदींची उपस्थिती असते.
जिल्ह्यातील पेट्रोल पंप २२४
दरराेज विक्री होणारे डिझेल ७५००००
दररोज विक्री होणारे पेट्रोल ८०००००
वर्षभरात ०० तक्रारी
१. वैधमापन विभागाकडे वर्षभरात एकही तक्रार दाखल झालेली नाही. ग्राहक जागरुक नसल्याचे लक्षात येते.
२. काही ग्राहक तर केवळ पैसे देऊन मोकळे होतात. रिडींगकडे किंवा किती पेट्रोल टाकले याकडे लक्षही देत नाहीत.
३. सर्वसामान्य नागरिकांची सर्वाधिक फसवणूक पेट्रोल पंपावर होत असल्याचे निदर्शनाला आले आहे. परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात आले तरी ते सिध्द कसे करावे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
वर्षातून केवळ एक वेळा तपासणी
वैधमापन विभागाकडून पेट्रोल पंपांची वर्षातून केवळ एकच वेळा तपासणी करण्यात येते, अशी माहिती वैधमापन विभागाने दिली. ठरल्याप्रमाणे तपासणी होते. तक्रारी आल्यास तपासणी केली जाते. परंतु तक्रारीच दाखल झालेल्या नाहीत.
पेट्रोल पंपावर डिझेल टाकताना घ्या काळजी
रिडिंग झिरो आहे हे आधी पाहावे. तेल टाकत असताना काही हातचलाखी केली जात आहे का ते पाहावे. तेल टाकत असताना लक्ष इतरत्र विचलित होऊ देऊ नये. काही शंका आल्यास प्रत्येक पंपावर पाच लीटरचे प्रमाणित माप उपलब्ध असते. त्याद्वारे खात्री करावी.
पेट्रोल आणि डिझेल कमी दिल्याबाबत एकही तक्रार नाही. कोणी तक्रार केली तर त्या पेट्रोलपंपावर जाऊन तपासणी केली जाते. ५ लीटरच्या प्रमाणात २५ मिली जास्त तफावत आढळली तर त्या पेट्रोलपंप चालकाला नोटीस देऊन नियमानुसार पुढील कारवाई केली जाते.
शिवाजी काकडे, सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र, मुंबई महानगर