मुंबई : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत. या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी सोमवार धरणे आंदोलन जाहीर केले आहे. संपूर्ण राज्यात सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच वेळी धरणे आंदोलन करावे, असे आवाहन वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केले आहे.
प्रथम १३ जुलै रोजी या मागणीसाठी राज्यस्तरीय वीज बिल होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते. हे आंदोलन राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये, कांही ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये, अनेक गावांमध्ये व मुंबईसह अनेक महापालिका क्षेत्रात झाले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलांमध्ये २० ते ३० टक्के सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तथापि ही तोकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही. दरम्यान, धरणे आंदोलन, निवेदन या सर्व प्रसंगी योग्य अंतर ठेवणे, मास्क वापरणे याबाबत सर्व शासकीय सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. जेथे शक्य वा आवश्यक असेल, तेथे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात यावे.
--------------------
- संपूर्ण वीज बिल माफीची मागणी करावी.- ठरावांच्या प्रती राज्य सरकारकडे पाठवाव्यात.