Join us

एमटीएनएल, बीएसएनएलचे ग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:06 AM

एमटीएनएल, बीएसएनएलचे ग्राहक दुसऱ्या दिवशीही नेटवर्कच्या प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका दूरसंचार क्षेत्रालाही बसला. खासगी ...

एमटीएनएल, बीएसएनएलचे ग्राहक दुसऱ्या दिवशीही नेटवर्कच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका दूरसंचार क्षेत्रालाही बसला. खासगी कंपन्यांनी तत्काळ आपली सेवा पूर्ववत केली असली, तरी सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएल आणि बीएसएनलचे ग्राहक मात्र दुसऱ्या दिवशीही नेटवर्कच्या प्रतीक्षेत होते.

सोमवारी पश्चिम उपनगरातील बहुतांश भागांत एमटीएनएलची सेवा विस्कळीत झाली. लँडलाईनबरोबरच मोबाईललाही नेटवर्क नसल्याने ग्राहक हतबल झाले. मंगळवारी सायंकाळपर्यंत स्थिती कायम होती. त्यामुळे चक्रीवादळाचा फटका बसलेल्या आप्त-स्वकीयांची ख्याली खुशालीही विचारता येत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मालाड पूर्व, कांदिवली, दहिसर, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पश्चिम, सांताक्रुझ आणि दक्षिण मुंबईतील काही भागांतील ग्राहकांना सलग दुसऱ्या दिवशी हा त्रास सहन करावा लागला. बीएसएनएलचे नेटवर्कही गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहे.

कामगारांची संख्या कमी असल्याने दुरुस्ती कामांवर परिणाम होत असल्याची माहिती पवई येथे दुरुस्ती काम करणाऱ्या एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांनी दिली. या दोन्ही कंपन्या तोट्यात असल्यामुळे स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर करण्यात आली. त्यानंतर जवळपास ९० टक्के कर्मचाऱ्यांनी निवृत्ती घेतली. सध्या अत्यल्प मनुष्यबळात काम सुरू असल्याने वेळोवेळी सेवेवर परिणाम होत असतो, असे एमटीएनएलमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, यासंदर्भात एमटीएनएलच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

........................................................