चेंबूर, घाटकोपरमधील येस बँकेबाहेर ग्राहकांच्या रांगा; एटीएममध्ये खडखडाट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 06:32 AM2020-03-07T06:32:36+5:302020-03-07T06:32:47+5:30
येस बँकेच्या शाखांबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध लादले होते.
मुंबई : कर्जाचा एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. यामुळे खातेदारांना महिनाभरात आपल्या खात्यातून केवळ ५० हजार रुपयेच काढता येतील. त्यामुळे तणावात आलेल्या येस बँकेच्या मुंबईतील खातेदारांनी शुक्रवारी सकाळपासूनच बँकेच्या विविध शाखांबाहेर रांगा लावल्या होत्या. काही एटीएम रिकामी असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. येस बँकेच्या शाखांबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध लादले होते. यामुळे पीएमसीचे खातेदार अद्यापही पैसे मिळण्यासाठी झगडत आहेत. येस बँकेवरदेखील रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) निर्बंध लादल्यामुळे खातेदारांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
चेंबूरमधील स्वस्तिक पार्क, मैत्री पार्क व सेंट्रल एवेन्यू मार्ग तसेच घाटकोपरच्या पंतनगर येथील शाखेबाहेर पैसे काढण्यासाठी शुक्रवारी खातेधारकांनी रांगा लावल्या होत्या. दक्षिण मुंबईत फोर्ट परिसरातही विविध ठिकाणी पैसे काढण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली. येस बँकेच्या शाखा असलेल्या मुंबईतील इतर ठिकाणीही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. आपले पैसे लवकरात लवकर बँकेतून काढण्यासाठी खातेदारांची धावपळ सुरू होती.
येस बँकेबाहेर रांगा लावलेल्या खातेदारांना एटीएममधून पैसे काढण्यास मज्जाव केला जात होता. यामुळे ग्राहक बँक कर्मचारी तसेच बँकेबाहेर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांसोबतदेखील वाद घातलाना पाहायला मिळाले. येस बँकेच्या मुंबईतील बऱ्याच एटीएममध्येही खडखटात होता. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून बँकेच्या शाखांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
>चार चास फिरूनही रिकाम्या हाती परतलो
मी कांदिवली परिसरात एटीएममध्ये मध्यरात्री १ वाजता गेलो. रांगेत २५ जण होते. एटीएममध्ये पैसे नसल्याने मला पैसे मिळाले नाहीत. इतर ठिकाणच्या ३ ते ४ एटीएममध्ये गेलो. दहिसर, मालाड येथेही फिरलो. पहाटे ४ वाजता घरी गेलो. पण एकाही एटीएममध्ये पैसे नव्हते. त्यामुळे रिकाम्या हाती घरी परतलो, असे खातेदार विजय सिंग यांनी सांगितले.
महावितरणकडून ग्राहकांना सूचना : मुंबई : रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर महावितरणनेही संबंधित बँकेतील कामकाजाबाबतचे निर्देश जारी केले आहेत. ग्राहकांशी संवाद साधत बिलाचे पैसे एसबीआयमध्ये भरणे, पुढील आदेश येईपर्यंत संबंधित बँकेतील धनादेशाबाबतचे कामकाज थांबविणे, रक्कमेचे हस्तांतरण करताना काळजी घ्यावी, अशा आशायाचे अनेक सूचना महावितरणने आपल्या विभागांना करत त्याचे परिपत्रक काढले आहे.
आॅनलाइन ट्रान्झॅक्शन बंद
येस बँकेवर निर्बंध जाहीर झाल्यानंतर अनेकांनी एटीएमबाहेर गर्दी केली. त्यामुळे काही ग्राहकांनी आॅनलाइन ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न केला; परंतु आॅनलाइन ट्रान्झॅक्शन बंद होते. त्यामुळे ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता
येस बँकेने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर उद्योग समूहांना कर्ज वाटली आहेत; जी थकित झाल्याने बँक अडचणीत आली आहे. हे काही एकाएकी घडलेले नाही. या काळात रिझर्व्ह बँकेची भूमिका काय होती? रिझर्व्ह बँकेने वेळीच हस्तक्षेप करुन येस बँकेला अटकाव करायला हवा होता.
- देवीदास तुळजापूरकर, सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन