रेडिमेड रांगोळीला ग्राहकांची पसंती
By Admin | Published: November 9, 2015 03:05 AM2015-11-09T03:05:48+5:302015-11-09T03:05:48+5:30
दिवाळीच्या दिवसांत दारासमोर रांगोळी आवर्जून काढली जाते. पण हल्ली ठिपक्यांच्या रांगोळीला पर्याय म्हणून रांगोळीचे इन्सटंट प्रकार बाजारात आले आहे.
लीनल गावडे, मुंबई
दिवाळीच्या दिवसांत दारासमोर रांगोळी आवर्जून काढली जाते. पण हल्ली ठिपक्यांच्या रांगोळीला पर्याय म्हणून रांगोळीचे इन्सटंट प्रकार बाजारात आले आहे. यंदा बाजारात रेडिमेड रांगोळीने सगळ्यांनाच आकर्षून घेतले आहे. प्लास्टिक मटेरिअलमध्ये असणारी ही रांगोळी कोयरी, पाकळ््या, पंचकोन, चौकोन, अर्धगोल अशा विविध आकारांत मिळते. लाल, निळा, पिवळा, हिरवा, जांभळा या रंगांत या नक्षी असून, त्यावर मल्टीकलर स्टोन्समध्ये वर्क केलेले असते.
विशेष म्हणजे ही रांगोळी हवी तशी नक्षी तयार करून मांडता येते. हल्लीच्या सोसायटीच्या संस्कृ तीत घराबाहेर जागा कमी असते. अशा वेळी ही रांगोळी कमी जागेत झटपट मांडता येते. तसेच ही रांगोळी उचलताना झाडलोट करावी लागत नाही. पायाखाली रांगोळीचे रंगही येत नाहीत. ही नक्षी स्वच्छ पुसून ठेवता येते. रेडिमेड रांगोळीच्या या वैशिष्ट्यांमुळे रेडिमेड रांगोळीची मागणी यंदा वाढली आहे. रेडिमेड फरांळासोबत भेट म्हणूनही अशा प्रकारची रांगोळी दिली जाते, असे रांगोळी विक्रेते सांगतात.
या रेडिमेड रांगोळीसोबतच रांगोळीच्या जाळ््यांनासुद्धा मागणी असते. यंदा जाळ््यांमध्ये विविधता आहे. दादर, परळ, लालबाग, क्रॉफेड मार्केट, भुलेश्वर, लालबाग तसेच अनेक उपनगरांत या जाळ्या सहज मिळतात. पानाफुलांच्या नक्षीपासून ते अगदी काढायला कठीण अशा रांगोळीच्या विविध नक्षी यात मिळतात. या गोलाकार, आयताकृती आणि चौकोनी या आकारात मिळत असून, यामध्ये लहानमोठ्या जाळ्यांचा पर्यायदेखील आहे. या जाळ््यांनी रांगोळी कशी काढायची, हे अनेक विक्रेते दाखवतात.
संस्कार भारतीच्या रांगोळीची आवड असणाऱ्यांसाठी रांगोळीच्या पेन्स, पेन्सिल आहेत. यांचा वापर करून संस्कारभारती रांगोळीचे विविध प्रकार काढता येतात. उदा. गोपद्म, कमळ, सर्परेषा इत्यादी प्रकार रेखाटता येतात. कल्पकता वापरून त्यापासून वेगवेगळ्या रांगोळीच्या नक्षी काढता येतात.