महावितरण : चक्रीवादळात निष्ठेने काम कारणाऱ्यांबद्दल कृतज्ञता दाखवा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चक्रीवादळानंतर केलेल्या अथक प्रयत्नांमुळे भांडुप परिमंडलातील १०० टक्के गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे तीन दिवसांत १,९९८ गावांत पुन्हा विजेचा लखलखाट झाला. वादळात, अविरत, निष्ठेने काम करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता दाखविण्यासाठी ग्राहकांनी आपले वीजबिल भरून सहकार्य करावे, जेणेकरून महावितरणची आर्थिकरीत्या विस्कटलेली घडी पुन्हा सावरण्यास मदत होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने, तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा महावितरणच्या ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, पालघर जिल्ह्यांतील अनेक गावांना बसला. या चक्रीवादळामुळे महावितरणची वीज यंत्रणाही प्रभावित झाली असून, अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. चक्रीवादाळाने किनारपट्ट्यांवरील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना धडक दिली. मोठे वृक्ष उन्मळून पडले, काही ठिकाणी विद्युत खांब पडले, काही ठिकाणी वीजतारा तुटल्या. यामुळे महावितरणअंतर्गत ठाणे, मुलुंड, भांडुप, ऐरोली, घणसोली, तसेच रायगड जिल्ह्यातील उरण, अलिबाग, गोरेगाव, रोहा येथे महावितरण यंत्रणेला तडाखा बसला होता. भांडुप परिमंडळातील ३४ स्विचिंग उपकेंद्र, ३५२ फीडर, १९९८ गाव, ८३४३ वितरण रोहित्र, ३७४ उच्चदाब खांब, ८०७ लघुदाब खांब, यामुळे ९ लाख ४८ हजार ५३० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. आता हा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे.
..........................