ग्राहकांना आता नवीन वर्षात मिळणार ‘बेस्ट’ दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:50 AM2018-11-29T01:50:09+5:302018-11-29T01:50:13+5:30
नवीन वीजदर पत्रक सादर : तांत्रिक कारणांसाठी दरकपात लांबणीवर
मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) मंजुरी दिल्यानंतर बेस्ट उपक्रमाने नवीन वीज दरपत्रक बेस्ट समितीपुढे सादर केले. त्यानुसार सप्टेंबरपासून वीज दरांमध्ये कपात होणार होती. मात्र तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तब्बल तीन महिने लावले. यामुळे ही दरकपात आता नवीन वर्षापासून म्हणजे जानेवारी महिन्यात लागू होणार आहे.
बेस्ट उपक्रमामार्फत शहर विभागातील दहा लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. टाटा कंपनीकडून वीज खरेदी करून बेस्ट उपक्रम आपल्या ग्राहकांना वीजपुरवठा करीत आहे. मात्र ही मक्तेदारी मोडीत निघून टाटा कंपनीसाठी शहरातील द्वार खुले झाल्याने बेस्ट उपक्रमाला धोका निर्माण झाला आहे. नफ्यात असलेल्या वीजपुरवठा विभागाचा कारभार सुरळीत राहण्यासाठी विजेचे दर कमी ठेवणे बेस्ट उपक्रमाला भाग आहे. त्यामुळे एमआरसीकडे सादर करण्यात आलेल्या वार्षिक महसूल अहवालात वीज दर कमी करण्याची शिफारस बेस्ट प्रशासनाने केली होती.
तांत्रिक अडचणीमुळे होतोय विलंब
काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी हा विलंब होत आहे. मात्र बेस्टच्या ग्राहकांना नवीन वर्षापासून आयोगाने निर्देश दिल्यानुसार दर कमी करून वीज बिले पाठविण्यात येतील, असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले.
तीन महिन्यांचा लाभ मिळणार
वीज दरामध्ये सप्टेंबर महिन्यापासूनच कपात होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक कारणाने विलंब झाल्यामुळे ग्राहकांना जुन्याच दराने वीज बिले पाठविण्यात येत आहेत. मात्र सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांतील वीज बिलांमधून वसूल केलेली जादा रक्कम नवीन वर्षाच्या बिलामध्ये वळती करण्यात येईल, अशी हमी बेस्ट प्रशासनाने दिली.
सप्टेंबर महिन्यापासून ही दरकपात लागू होणे अपेक्षित असताना अद्याप त्यावर अंमल झालेला नाही. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी ही बाब हरकतीच्या मुद्द्याद्वारे बेस्ट समितीच्या निदर्शनास आणली.
बेस्ट प्रशासनाने वाहतूक तूट दीड वर्ष वीज ग्राहकांच्या माथी मारली. आता तर आयोगाने निर्देश देऊनही बेस्ट प्रशासन त्याची अंमलबजावणी करीत नाही. यामुळे जुन्याच दराने वीज बिल ग्राहकांना मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. याविरोधात दाद मागणार, असा इशारा रवी राजा यांनी दिला.
असे असणार नवे दर (आकडेवारी प्रति किलो वॅट)
प्रकार २०१८-१९ २०१९-२०
औद्योगिक ७.५८ ६.२९
व्यावसायिक ७.८८ ६.४८
मोनो, मेट्रो, रेल्वे ६.१८ ५.०२
रुग्णालय, शैक्षणिक संस्था ७.२६ ५.७०
निवासी (दारिद्र्यरेषेखाली) १.२२ १.०२
०-१०० युनिट १.६७ १.६५
१०१-३०० ३.९२ ३.९०
३०१-५०० ६.७२ ६.७०