मुंबई : ग्राहक चळवळ मजबूत करण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करून पुढील १० वर्षांत ग्राहकाला ‘ग्राहक राजा’ ही उपाधी मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिप्रादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ग्राहक पंचायत समितीत ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ग्राहकहिताचेच काम करीत आहे. या समितीला घरपोच माल वितरण करण्यासाठी राज्यात जागा दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळेला दिले.मुंबई ग्राहक पंचायतीच्या ४०व्या वर्धापन दिनानिमित्त विलेपार्ले येथील ग्राहक पंचायतीच्या सुधीर फडके सभागृहात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी ग्राहक पंचयातीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे, रामदास गुजराथी, कार्यवाह अनिता खानोलकर तसेच दत्ता वाघ इत्यादी मान्यवर सदस्य उपस्थित होते.ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक चळवळ मजबूत असणे आवश्यक असते. ही ग्राहक चळवळ समृद्ध करण्यासाठी चळवळीच्या सल्लागार समितीत भरीव कार्य करणारे सदस्य असणे आवश्यक आहे. असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ग्राहक पंचायतीत ३५ हजारांवे सदस्यत्व देऊन माझा एक प्रकारे सन्मानच केला आहे. तसेच ग्राहकांना आपले हक्क मिळतील यासाठी शासन सतत प्रयत्नशील असेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.अध्यक्षीय भाषणात रामदास गुजराथी म्हणाले की, अहमदाबादमध्ये वस्तूंची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा आहे. तशीच प्रयोगशाळा आपल्या राज्यात व्हावी, म्हणजे त्याचा ग्राहकाला फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे म्हणाले की, आज पंचायतीला ४० वर्षे पूर्ण होत असून पंचायत वितरण करीत असलेला ‘ना नफा ना तोटा’ माल विक्रीमुळे २० हजार टन प्लास्टिक वाचविले जाते. तर घरपोच व्यवस्थेमुळे इंधनातही बचत होते. (प्रतिनिधी)
ग्राहक पंचायतीला जागा देऊ
By admin | Published: March 23, 2015 2:17 AM