मुंबई - मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने गेल्या काही दिवसांत पकडलेल्या अंमली पदार्थांना नुकतेच नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३१ किलो हेरॉईन व १२ किलो गांजा असे एकूण ४३ किलो वजनाचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २९७ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. नवी मुंबई येथील तळोजा येथे हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. गेल्या महिन्यात सीमा शुल्क विभागाने एकूण २८ किलो वजनाचे अंमली पदार्थ नष्ट केले होते.
यामध्ये चरस, गांजा, कोकेन व नशा देणाऱ्या काही औषधांचा समावेश होता. त्याची किंमत २ कोटी १६ लाख रुपये इतकी होती. याच वर्षी मे महिन्यात मुंबईतील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १५०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले होते. एनडीपीएस कायद्याअंतर्गत अंमली पदार्थ पकडण्यात आल्यानंतर ते नष्ट करणे गरजेचे असते. ते नष्ट करण्यासाठी सीमा शुल्क विभागाला राज्य प्रदूषण मंडळाच्या सूचनेप्रमाणे ते नष्ट करावे लागतात.