* कस्टमची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वस्तूची खोटी यादी व बनावट पावत्यांच्या साहाय्याने सीमाशुल्क आणि आयजीएसटी बुडवून आयात करण्यात आलेला तब्बल १५ कोटींचा ऐवज जप्त केला. केंद्रीय सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली.
जप्त केलेल्या वस्तूंमध्ये आयफोन, ड्रोन, महागडी घड्याळे, सिगारेट आदी साहित्याचा समावेश आहे. अंधेरी, चकाला येथील एमआयडीसी टपाल कार्यालय, बेलार्ड इस्टेट येथील विद्या डाक भवन व विलेपार्ले येथील एअर पार्सल सोटिंग कार्यालय यांनी ही कारवाई करून तस्करीतील या वस्तू जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीमा शुल्कच्या मुंबई विभाग-१च्या अखत्यारित असलेल्या गुप्तचर विभागाला टपालमार्गे सीमाशुल्क आणि आयजीएसटी कर चुकविण्यासाठी वस्तूंचे मूल्य, मूल्य आणि प्रमाण याबाबत वस्तूंची बनावट नावे व पत्ते देऊन परदेशातून मुंबईत आणण्यात आल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार विविध ठिकाणी छापे टाकून एकूण १४७० आयफोन, ३२२ ॲपल घड्याळे, ६४ ड्रोन्स, सिगारेट स्लीव्ह आणि ऑटो पार्ट्स जप्त करण्यात आले. त्यांची अंदाजे किंमत १५ कोटी असून संबंधित व्यापारी व मालकांना त्याबाबत नोटीस बजाविण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
.................