Join us

आरे कॉलनीत पाच हेक्टरवरील झाडे तोडली, मेट्रो रेलवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 6:07 AM

मेट्रो कारशेडच्या कामासाठी आरे कॉलनीतील २२०० झाडे तोडली जाणार आहेत.

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडसाठी प्रस्तावित जागेच्या पाहणीनंतरही शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला आहे. त्याचबरोबर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेताच पाच हेक्टर जागेवरील झाडे तोडण्यात आल्याने मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना आणि काँग्रेसने बुधवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत केली. यामुळे कारशेडसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव पुन्हा लांबणीवर पडला आहे.मेट्रो कारशेडच्या कामासाठी आरे कॉलनीतील २२०० झाडे तोडली जाणार आहेत. मात्र पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची यासाठी मंजुरी आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. परंतु, गेली दोन वर्षे यावर निर्णय होऊ शकलेला नाही. ‘आरे’मध्ये ज्या ठिकाणी झाडे तोडली जाणार आहेत त्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांनी मंगळवारी भेट दिली.येथील २७ हेक्टरपैकी पाच हेक्टर जागेवरील झाडे तोडून त्या ठिकाणी कारशेडचे काम सुरू असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेताच पाच एकर जागेवरील झाडे तोडण्यात येतात कशी, असा सवाल उपस्थित करीत मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष हे स्वत: आयुक्त असल्याने ते स्वत: संबंधितांवर गुन्हे दाखल करू शकतात, असे मत त्यांनी मांडले.दोन वर्षे प्रस्ताव लांबणीवरआरे कॉलनीतील झाडे तोडून त्या जागेवर मेट्रो कारशेड बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमी, मनसेने विरोध केला होता. शिवसेनेनेही विरोधाचा झेंडा फडकविल्यामुळे झाडे तोडण्याची परवानगी मिळू शकली नव्हती. वृक्ष प्राधिकरणामध्ये तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती होईपर्यंत कोणताही निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली होती. गेले वर्षभर या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही.काँग्रेसही आक्रमक : विकासाला विरोध नाही; मात्र झाडे तोडण्यास आमचा विरोध आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी पाच हेक्टर जागेवरील झाडे तोडण्यात आल्याने मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली.

टॅग्स :मुंबई