शिवडी- न्हावाशेवा, सांताक्रुझ उन्नत मार्गासाठी वृक्ष तोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 02:41 AM2019-08-14T02:41:43+5:302019-08-14T02:41:57+5:30
शिवडी-न्हावाशेवा असा मुंबई पारबंदर प्रकल्प म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामासाठी शिवडी, सांताक्रुझ उन्नत मार्गामधील एकूण दीड हजार झाडे बाधित होत आहेत.
मुंबई : शिवडी-न्हावाशेवा असा मुंबई पारबंदर प्रकल्प म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामासाठी शिवडी, सांताक्रुझ उन्नत मार्गामधील एकूण दीड हजार झाडे बाधित होत आहेत. ही झाडे तोडण्यासाठी एमएमआरडीएने महापालिकेला प्रस्ताव पाठवला आहे. यावर २२ आॅगस्टला उद्यान अधीक्षकांच्या जिजामाता उद्यानातील कार्यालयात त्यावर जनसुनावणी होणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही होणार आहे.
शिवडी-न्हावाशेवा असा २२ किमीचा पूल एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येत आहे. आता या प्रकल्पाच्या कामाला गतीही आली आहे. एमटीएचएलच्या या प्रकल्पाच्या पॅकेज १ अंतर्गत १०.३८० किमी इतक्या लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे १ हजार ४ झाडे तोडावी लागणार आहेत. तर सांताक्रुझमध्ये नियोजित उन्नत मार्गाच्या बांधकामासाठी ३९७ झाडांचा बळी जाणार आहे. अशा प्रकारे एकूण १ हजार ४०१ झाडे तोडण्यात येतील.
यासंदर्भातील दोन प्रस्ताव एमएमआरडीएने महापालिकेकडे पाठविले आहेत. या दोन्ही प्रस्तावांवर महापालिका प्रशासनाकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. यावर २२ आॅगस्टला उद्यान अधीक्षकांच्या जिजामाता उद्यानातील कार्यालयामध्ये जनसुनावणी होणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी आरेमध्ये सुमारे अडीच हजार झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नसताना आता आणखी दीड हजार झाडे तोडण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएला पाठविल्याने पर्यावरणवाद्यांकडून पुन्हा विरोध होण्याची शक्यता आहे.
मेट्रो-३ चा कारडेपो आरेमध्ये उभारण्यात येणार आहे. आरेमध्ये कारशेडच्या ठिकाणी एकूण ३ हजार ६६१ झाडे आहेत. यातील २ हजार ७०२ इतकी झाडे आरे वसाहतीतील कारशेडच्या बांधकामासाठी बाधित होत आहेत. यामधील २ हजार २३८ झाडे तोडण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव एमएमआरसीने महापालिकेसमोर ठेवला आहे. आता एमएमआरडीएने दीड हजार झाडे काढण्याचा प्रस्ताव ठेवल्याने पर्यावरणवाद्यांचा विरोध आणखी प्रखर होणार आहे.