मुंबई : अयोध्या येथे सोमवारी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची उत्कंठा शिगेला पोहोचली असून, राज्यात सर्वत्र उत्सव साजरा करण्याची तयारी झाली आहे. विविध मंदिरांत यज्ञयागाचे आयोजन केले असून, मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी प्रभू श्रीरामांचे कटआऊट लावण्यात आले असून अवघा महाराष्ट्र राममय झाला आहे. आयोजनही करण्यात आले आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांचा उत्साह असून, नेटकरीही रामनामात तल्लीन झाले आहेत.
यज्ञाला प्रारंभ
अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना मंत्रघाेषांनी प्रारंभ झाला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी नवकुंडी यज्ञ करण्यात येत आहे. हा नवकुंडी यज्ञ मूळचे लांजा तालुक्यातील काेलधे येथील हेमंत गजानन मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखालील सुरू आहे. त्यांच्यासह ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद ऋचांनी यज्ञाला प्रारंभ करण्यात आला. अयोध्येतील सर्व विधी कृष्ण यजुर्वेदीय पद्धतीनुसार होणार आहेत. मात्र, चार वेदांपैकी पहिला ऋग्वेद हा ब्रह्मदेवाच्या चार मुखांपैकी पूर्वेकडील मुखातून प्रकट झाला होता, असे मानले जाते.
सुवर्णनगरीत अवतरले सोनेरी-चंदेरी राम-लखन, सीतामाता
सुवर्णनगरी जळगावात सोनेरी-चंदेरी श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमान अवतरले आहेत. घरात नित्य पूजनासह मित्र, नातेवाईकांना भेट देण्यासाठी श्रीराम मंदिर प्रतिकृती, लहान, मोठ्या आकारातील सोने-चांदीच्या मूर्ती, शिक्के, सुवर्ण मुलामा असलेल्या पादुका शहरातील सुवर्ण व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन दिवसांपासून या सर्वच वस्तूंना मोठी मागणी वाढली असून, सोमवार, २२ जानेवारीच्या मुहूर्तावर ही खरेदी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस झाले गीतकार, प्रभू श्रीरामावर गाणे
अमृता फडणवीस यांची गायकी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा गाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस यांचे गाणे प्रसिद्ध होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी दिली आहे. ‘प्रभू श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी गाणे लिहिले आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे, असे त्या म्हणाल्या.
तुळजापूरचे दाम्पत्य रामलल्लांच्या पूजेसाठी अयोध्येत
संपूर्ण हयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विस्तारकार्यात घालवलेल्या काक्रंबा येथील महादेव गायकवाड यांना रामलल्लांच्या पूजेसाठी सपत्नीक आमंत्रण मिळाले आहे. हे दाम्पत्य रविवारी अयोध्येत दाखल झाले. कोरोनावर उपचारासोबतच राम नामाचा जप केल्याने पुनर्जन्म मिळाला. रामलल्लांनीच आपल्याला आताही बोलावले आहे, अशी भावना गायकवाड यांनी बोलून दाखविली.