साधी नखं कापली तरी शिवसेना स्वत:ला शहीद म्हणून मिरवते- राम कदम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 10:51 PM2018-05-10T22:51:50+5:302018-05-10T22:57:43+5:30
माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक 28 मे रोजी होणार आहे.
मुंबई: साधी नखं कापायची आणि स्वत:ला शहीद म्हणवून घेत फिरायचे, असा शिवसेनेचा सध्याचा पवित्रा असल्याची टीका भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली. ते गुरूवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील पोटनिवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली.
माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक 28 मे रोजी होणार आहे. काँग्रेसच्या वतीने पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम हे मैदानात उतरले आहेत. शिवसेनेने आज याठिकाणी विश्वजित कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटले की, शिवसेनेची ही भूमिका दुटप्पी आहे. पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळेच त्यांचे पितळ उघडे पडले आहे, असेही त्यांनी सांगितले.
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा होती. पण भाजपाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. सहकार क्षेत्रात पतंगराव कदम यांची भूमिका पक्षीय राजकारणाच्या पलीकडची होती. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन, त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही विश्वजीत कदम यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती.
Cut your nails and declare yourself a martyr, this is Shiv Sena's thinking. Supporting Congress in Palus-Kadegaon assembly seat bypoll exposes their duplicity: Ram Kadam,BJP #Maharashtrapic.twitter.com/e5eP7eJHvn
— ANI (@ANI) May 10, 2018