Join us

नामवंत महाविद्यालयांचा 'कटऑफ' नव्वदीत; प्रवेशासाठी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 7:29 AM

अकरावीच्या दुसऱ्या यादीत किंचित घसरण

मुंबई : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीचा कटऑफ नव्वदीपार असताना दुसऱ्या यादीच्या 'कटऑफ' मध्ये किंचितशी घसरण दिसून आली. त्यामुळे पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चुरस वाढणार असून त्यांना प्रवेशासाठी वाट पाहावी लागणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील एक लाख ९३ हजार ७९२ जागांसाठी एक लाख ७५ हजार आठ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७३ हजार ४३८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. यापैकी २० हजार ३० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे, १३ हजार ४६९ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि १० हजार ३८८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे.

दुसऱ्या प्रेवश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० ते १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चितीची मुदत मिळणार आहे. इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गतच्या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश यादी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून संपर्क साधला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना १२ जुलैला सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोटांतर्गत प्रवेश निश्चित करावे लागतील. 

दरम्यान, विद्यार्थ्याने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन यापैकी कोणत्याही कोटांतर्गत एकदा प्रवेश निश्चित केल्यास तो पुढील सर्व फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केला जातो.

दुसऱ्या यादीतही नामांकित महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम राहिल्याचे दिसून आले. एच. आर. महाविद्यालयाचा 'कटऑफ' अवघा ०.६ टक्क्यांनी, तर पोदार महाविद्यालयाचा 'कटऑफ' केवळ ०.२ टक्क्यांनी घसरला आहे.

सायन येथील एसआयइस महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा 'कटऑफ', तर जवळपास अडीच टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.

सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या कला शाखेचा कटऑफ एक टक्क्याने कमी झाला आहे. 

वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा 'कटऑफ ही घसरल्याचे दिसून आले. अन्य बहुतांश महाविद्यालयांचा कटऑफ' ८५ ते ९० टक्क्यांच्या दरम्यान आहे.

दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय- १,९३,७१२

अर्ज केलेले विद्यार्थी १,७५,००८

दुसऱ्या यादीत प्रवेश जाहीर झालेले विद्यार्थी ७३,४३८

पहिला पसंतीक्रम प्राप्त विद्यार्थी - २०,०३०दुसरा पसंतीक्रम प्राप्त विद्यार्थी - १३,४६९ तिसरा पसंतीक्रम प्राप्त विद्यार्थी - १०,३८८ 

टॅग्स :मुंबईमहाविद्यालय