मुंबई - विविध विकास कामांमध्ये बाधित ४८५ झाडं तोडण्यात येणार आहेत. या बदल्यात नवीन १०७६ झाडे लावण्यात येणार आहेत. तर १७९ झाडे पुर्नरोपित करण्यात येणार आहेत. या संदर्भातील दहा प्रस्तावांना वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
कोणत्याही प्रकल्पासाठी झाडे तोडण्यापूर्वी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी अनिवार्य आहे. तर एकाच कामासाठी दोनशेहून अधिक झाडे तोडायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार दोनशेहून अधिक झाडे तोडण्याचे दोन प्रस्ताव पालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. रेल्वे, एमएमआरडीए, मेट्रो, राज्य सरकारच्या अखत्यारीमधील एकूण २२ प्रस्ताव मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आले. यातील दहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तर दोन प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आले.
या प्रकल्पांमध्ये बाधित झाडे तोडणार...
- वडाळा ते ठाणेपर्यंतच्या मेट्रोच्या चौथ्या टप्प्यासाठी घाटकोपर येथे १३३ झाडे कापणे आणि १०८ झाडांचे पुर्नरोपण.
- विक्रोळी येथे १०५ झाडे कापणे आणि ३९ झाडांचे पुर्नरोपण तर, दोन - बी प्रकल्पांसाठी अंधेरी पश्चिम येथे ४१ झाडे कापणे आणि १४५ झाडे पुर्नरोपित.
- मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत विधानभवन स्थानकाच्या बांधकामासाठी २४ झाडे कापणे आणि १७ झाडे पुर्नरोपित करण्याचा प्रस्ताव आहे.
- पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते राममंदिर दरम्यान प्रस्तावित पुलासाठी नऊ झाडे कापणे, ५७ पुर्नरोपित करणे, अंधेरी ते आंबोली दरम्यानच्या प्रस्तावित पुलासाठी ३५ झाडे कापणे आणि १५ झाडे पुर्नरोपित करणे.
- सांताक्रुझ ते खार दरम्यान सहाव्या मार्गाच्या विस्तारासाठी १८ झाडे कापणे आणि २७ झाडे पुर्नरोपित करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले.
- कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या कोचिंग लाईनच्या बांधकामासाठी ११४ झाडे कापणे आणि ३२ झाडांच्या पुर्नरोपित.