१ एप्रिलपासून सीव्हीएम कूपन बंद
By admin | Published: March 28, 2015 12:40 AM2015-03-28T00:40:05+5:302015-03-28T00:40:05+5:30
तिकिटांचा सहजसोप्पा पर्याय असलेली सीव्हीएम (कूपन व्हॅलिडेटिंग मशिन) कूपन सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.
मुंबई : तिकिटांचा सहजसोप्पा पर्याय असलेली सीव्हीएम (कूपन व्हॅलिडेटिंग मशिन) कूपन सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून सीव्हीएम कूपन्सची तिकीट विक्री बंद केली जाणार असून ज्या प्रवाशांकडे सीव्हीएम कूपन आहेत त्यांना कूपन वापरण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
तिकीट खिडक्यांसमोरील रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सीव्हीएम कूपन यंत्रणा आणली. २00३ साली मध्य रेल्वेच्या स्थानकांवर आणि त्यानंतर पश्चिम रेल्वे स्थानकावर यंत्रणा बसवल्यावर त्याद्वारे ३0, ४0 आणि ५0 तसेच १00 रुपयांचे कूपन प्रवाशांसाठी उपलब्ध केले.
मात्र मध्यंतरी कूपनमध्येच झालेला गैरव्यवहार पाहता मध्य रेल्वेने कूपन सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मध्य रेल्वेमार्गावरील या यंत्रणेची माहितीही मध्यंतरी रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी घेतली आणि मार्च २0१४ नंतर ही यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पश्चिम रेल्वेलाही ही यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. मात्र त्यानंतर पश्चिम रेल्वेने ही सेवा बंद न करता सुरूच ठेवता यावी, यासाठी रेल्वे बोर्डाकडे पुन्हा तशी मागणीही केली. यात एटीव्हीएमची संख्या वाढत नाही तोपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याचे नमूद केले. मध्य रेल्वेनेही तशी मागणी करीत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला.
या मागण्या मान्य करत मार्च २0१५ पर्यंत सीव्हीएम कूपनला अखेरची मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला होता. ही मुदतवाढ संपुष्टात येत असल्याने त्यानुसार १ एप्रिलपासून कूपनची विक्री बंदच करण्याचा निर्णय घेतल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
रेल्वे बोर्डाकडून कूपन बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे पत्रच आले आहे. त्यानुसार कूपन सेवा बंद केली जाणार आहे.
- शरत चंद्रायन,
पश्चिम रेल्वे-मुख्य
जनसंपर्क अधिकारी
सीव्हीएम कूपनची विक्री १ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याजवळील कूपन एक महिन्यापर्यंत वापरावेत.
- नरेंद्र पाटील, मध्य रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी
च्रेल्वेकडून एटीव्हीएम मशिन, जनसाधारण तिकीट सेवा आणि मोबाइल तिकीट सेवेवर भर दिला जात असून या सेवांचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे