मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉलच्या) तिसऱ्या वर्षाच्या बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाला. या सायबर अटॅकमुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना लिंक पोहचली नाही आणि परीक्षांना मुकावे लागले. दरम्यान या सायबर अटॅकची अधिकृत तक्रार विद्यापीठ प्रशासन नोंदविणार असून मंगळवार आणि बुधवारच्या आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मंगळवारी उशिरा जाहीर करण्यात आली.
याचसोबत ७ ऑक्टोबर २०२० रोजी होणाऱ्या परीक्षा तिसऱ्या वर्षाच्या बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, बीएस्सी आयटी सत्र ६ व बॅकलॉगच्या परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, एमसीए सत्र १ व सत्र २ या परीक्षाचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. ६ व ७ ऑक्टोबर २०२० रोजीच्या या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जाणार आहेत.