वाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 04:53 AM2019-06-16T04:53:04+5:302019-06-16T06:23:41+5:30
सायबर हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याला प्रतिबंध घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
मुंबई : सर्वच व्यवहारांचे डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सायबर हल्लेही वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याला प्रतिबंध घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. वांद्रे (पश्चिम) येथील सायबर क्राइम पोलीस स्टेशन व पोलीस उपायुक्त सायबर क्राइम कार्यालय व निवासस्थानांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, व्यवहारांचे डिजिटायझेशन वाढत आहेत. त्यामुळे फिशिंगच्या माध्यमातून सामान्यांची लुबाडणूक होऊ शकते. जगाच्या एखाद्या कोपऱ्यात बसूनही गुन्हेगार कार्यभाग साधू शकतो. त्यामुळे या आव्हानाला तोंड देण्यासाठीची अत्याधुनिक तंत्रप्रणाली, व्यवस्था उभी करावी लागते. महाराष्ट्राने सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने व्यवस्था उभी करण्यात देशात अव्वल स्थान मिळवले आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मिळून अशा चाळीस सायबर लॅब स्थापन केल्या आहेत. सायबर स्पेसमधील युद्धासाठी मायक्रोसॉफ्टने सायबर वॉरियर्स तयार केले आहेत. सायबर हल्ले रोखण्यासाठी सक्षम फायरवॉल्स, सक्षम अशी सायबर आर्मी तयार करावी लागेल. त्यासाठी राज्यात सुमारे एक हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, या व्यवस्थेमुळे सायबर गुन्ह्यांना आळा घालता येईल, असे ते म्हणाले.
पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी प्रास्ताविकात सायबर क्राइम पोलीस स्टेशन व अनुषांगिक व्यवस्थांच्या उभारणीबाबत यावेळी माहिती दिली. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार पूनम महाजन, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, महासंचालक (पोलीस गृहनिर्माण) बिपीन बिहारी आदी उपस्थित होते.