Join us

भारतावर सायबर हल्ला हे असेल दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 4:23 PM

निवृत्त माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांचे मत

मुंबई : दहशतवादी दरवेळी हल्ल्याची नवीन पद्धत अवलंबतात. १३ वर्षांनंतर देखील ते त्याच पद्धतीने हल्ला करतील असे नाही. त्यामुळे दहशतवाद्यांचा यापुढील हल्ला हा सायबर हल्ला राहण्याची शक्यता आहे. हा हल्ला रोखण्यासाठी व त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार असायला हवे, असे मत राज्याचे निवृत्त माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांनी व्यक्त केले. 

ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवारी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात २६/११ चा हल्ला आणि आजच्या काळातील भारतासमोरील संरक्षण आव्हाने या अहवालाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते. बुलेटप्रूफ उपकरणांच्या कमतरतेमुळे २६/११ च्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. मात्र या हल्ल्यानंतर आपण अधिक सावध झालो आहोत. त्यामुळे यापुढे तसा हल्ला झालाच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याकडे पोलीस, कमांडो यांची फौज तैनात आहे. त्याचप्रमाणे बुलेटप्रूफ जॅकेट, गाड्या तसेच विविध अत्याधुनिक उपकरणे आहेत. 

पठाणकोट, उरी येथे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर करताना याची प्रचिती आपल्या सर्वांना आली. मुंबईवर जलमार्गे, हवाईमार्गे किंवा जमिनीमार्गे हल्ला झाल्यास त्यासाठी मुंबई संपूर्णपणे तयार आहे. तसेच पोलिसांबद्दल ते म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस व मुंबई पोलीस हे आजही देशात सर्वोत्तम आहेत. त्यांना केवळ चांगल्या नेतृत्वाची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक धोरणे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशनतर्फे डॉ. विजय पागे यांनी एका थिंक टँकची स्थापना केली आहे. या कार्यक्रमात त्यांच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी कॅबिनेट सचिव आणि माजी विशेष सचिव, निवृत्त आयपीएस अधिकारी व्ही बालचंद्रन, कोस्ट गार्डचे माजी महासंचालक पी पालेरी व आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई