Join us

सायबर कॅफे मालक गजाआड

By admin | Published: September 24, 2015 1:50 AM

एका खाजगी कंपनीची हुबेहूब वेबसाइट तयार करून त्याद्वारे शैक्षणिक कर्जासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची फसवणूक करणाऱ्या ठगाच्या सायबर सेलच्या पथकाने मुसक्या आवळल्या.

डिप्पी वांकाणी, मुंबई एका खाजगी कंपनीची हुबेहूब वेबसाइट तयार करून त्याद्वारे शैक्षणिक कर्जासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची फसवणूक करणाऱ्या ठगाच्या सायबर सेलच्या पथकाने मुसक्या आवळल्या. ग्रंथ महिपाल राणे असे आरोपी ठगाचे नाव असून, नागपूरमध्ये त्याचे स्वत:च्या मालकीचे सायबर कॅफे आहे.मूळचा नागपूरचा रहिवासी असलेल्या राणे याच्याविरोधात १२ आॅगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तक्रारदार हे एका खासगी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर असून, त्यांची कंपनी तरुणांना शैक्षणिक कर्ज मिळवून देण्याचे काम करते. कंपनीच्या वेबसाइटवर अनेक जण अर्ज करून शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करतात. १६ जुलै रोजी तक्रारदारांना त्यांच्याच कंपनीचे नाव, मजकूर, टे्रड मार्क, लोगो असलेली हुबेहूब असलेल्या एका दुसऱ्या कंपनीची वेबसाइट दिसली होती. या कंपनीत एका व्यक्तीचे नाव आणि बँकेचा खातेक्रमांक देण्यात आला होता. त्यात शैक्षणिक कर्जासाठी इच्छुक असलेल्या लोकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले होते, ही बाब उघड होताच तक्रारदारही चक्रावले. त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत संबंधित बोगस कंपनीला एक नोटीस पाठविली होती. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने अखेर त्यांनी सायबर सेल पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून सायबर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता राणेने ही वेबसाइट बनविल्याचे उघडकीस आले. त्याला चौकशीसाठी सायबर सेल विभागात हजर राहण्याचे आदेश दिले. रविवारी तो तेथे हजर होताच पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात राणेला अटक केली. त्यातही येणारे पैसे त्याने स्वत:च्या खात्यात जमा करण्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्याच्या खात्याचीही चौकशी सुरू असून, यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे.