सायबर गुन्हे २४३ टक्के; आमदारांचे प्रश्न फक्त २९
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:22 AM2023-11-24T11:22:11+5:302023-11-24T11:22:23+5:30
प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातील वास्तव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराष्ट्रीय शहर, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरी गुन्ह्यांचीही राजधानी बनली आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मुंबईत वाढले असून, २०१८ ते २०२२ या कालावधीत त्यात २४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आकडेवारीनुसार सायबर गुन्ह्यांची संख्या १३७५ वरून ३७२३ पर्यंत वाढली आहे. २०२२ मध्ये ‘क्रेडिट कार्ड फसवणुकीचे सायबर गुन्हे सर्वाधिक नोंदवलेले असून, या कालावधीत क्रेडिट कार्ड फसवणुकीचे गुन्हे ४६१ वरून ३४९० एवढे वाढले आहेत. म्हणजेच त्यात ६५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय गुन्ह्यांमध्ये आरोपी सापडल्याचे प्रमाण केवळ ८ टक्के आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये आमदारांनी अवघे २९ प्रश्न अधिवेशनात विचारले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील गुन्ह्याबाबत आमदारांकडून सरासरी १३ ते २२ प्रश्न विचारण्यात येत असल्याचेही प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले. यामध्ये अपुऱ्या मनुष्यबळाबाबतही अवघे १४ प्रश्न अधिवेशनात विचारण्यात आले.
पोलिस तक्रार प्राधिकरणात तीन वर्षात अवघे पाच गुन्हे निकाली
पोलिस तक्रार घेत नसतील तर त्यांच्या विरोधात तक्रार करता यावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाच्या कामकाज सध्या ठप्प झालेला आहे. अनेक पद रिक्त असल्यामुळे तक्रारींचे निवारण होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन वर्षात अवघे ५ गुन्ह्यात दोषसिद्धी मिळवण्यात यश आल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे.