सव्वा दोन हजार गुह्यांपैकी अवघ्या २०७ गुह्यांची उकल
मुंबईत सायबर गुन्हेगारीचे आव्हान कायम
सव्वादोन हजार गुन्हे दाखल : अवघ्या २०७ गुन्ह्यांची उकल करण्यात यश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत सायबर गुन्हेगारीचे आव्हान कायम असून, गेल्या वर्षभरात दाखल २ हजार ४३५ गुन्ह्यांपैकी अवघ्या २०७ गुन्ह्यांचा उलगडा करण्यास यश आले आहे. यात अश्लील ई-मेल्स, संदेश, एमएमएसप्रकरणी २४७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात सायबर गुन्ह्यांत १७ टक्के वाढ झाली. नागरिकांमधील कोरोनाबाबतची माहिती जाणून घेण्याचे कुतूहल, दहशतीचा फायदा ऑनलाईन भामट्यांनी उचलण्यास सुरुवात केली. या भामट्यांनी जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ) किंवा तत्सम् नामांकित खासगी किंवा शासकीय यंत्रणेच्या नामोल्लेखाने फसवे ई-मेल केले. या ई-मेलमध्ये कोरोनाबाबतची महत्त्वपूर्ण माहिती असल्याचा दावा केला जातो. माहिती जाणून घेण्यासाठी अटॅचमेन्ट दिली जाते, ती पीडीएफ, एमपी ४ किंवा डॉक्स प्रकारातील असते. प्रत्यक्षात त्याआड मालवेअरद्वारे वापरकर्त्याचे तपशील, पासवर्ड चोरून अनेकांचे खाते रिकामी केले आहे.
मुंबईत २०१९ मध्ये दाखल २,२२५ गुन्ंह्यापैकी २८४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. यात, स्पूफिंग मेल (१४), फिशिंग, हँकिंग (३७), अश्लील ई-मेल्स, एसएमएस, एमएमएस (२४७), फेक सोशल मीडिया (३०), क्रेडिट कार्ड फसवणूक (५५८) गुन्ह्यांचा समावेश आहे.
आकडेवारी
.....
गुन्ह्याचे प्रकार २०२० २०१९
दाखल उकल दाखल उकल
स्पूफिंग मेल १४ १ २६ ०१
फिशिंग, हँकिंग ३७ ०६ ३४ ०२
अश्लील ई-मेल्स २४७ ९१ २३९ १०४
फेक सोशल मीडिया ३० ०८ ६१ २३
क्रेडिट कार्ड फसवणूक ५५८ २१ ७७५ ४०
अन्य गुन्हे १५४५ ७८ १०८७ ११२
.....
ट्विटरवरून जनजागृती
सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवरून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच वेळोवेळी नागरिकांना सतर्क राहत, आपली गोपनीय माहिती कुणालाही शेअर करू नका, असे आवाहनही करण्यात येत आहे.
....
पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांची होणार मदत
मुंबईत प्रादेशिक स्तरावर लवकरच सुरू होणाऱ्या ५ नवीन सायबर पोलीस ठाण्यांमुळे सायबर गुन्हेगारीवर रोख आणण्यास मदत होईल, असा विश्वासही पोलिसांना आहे.