नवी मुंबईत सायबर क्राइम कमांड आणि कंट्रोल सेंटर, दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:36 IST2024-12-30T15:36:14+5:302024-12-30T15:36:32+5:30
प्रगत ऑनलाइन सुरक्षेद्वारे महाराष्ट्राचे डिजिटल भविष्य सुरक्षित करण्यासाठी, या प्रकल्पांतर्गत दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात सायबर गुन्ह्यांविरुद्ध सायबर रक्षकाची फौज अधिक मजबूत होणार आहे.

नवी मुंबईत सायबर क्राइम कमांड आणि कंट्रोल सेंटर, दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण
मुंबई : ‘महासायबर’ सुरक्षा प्रकल्पांतर्गत देशातील पहिले राज्यस्तरीय सायबर क्राइम कमांड आणि कंट्रोल सेंटर नवी मुंबईमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यात सायबर गुन्हे अहवालाची अनेक माध्यमे आहेत.
प्रगत ऑनलाइन सुरक्षेद्वारे महाराष्ट्राचे डिजिटल भविष्य सुरक्षित करण्यासाठी, या प्रकल्पांतर्गत दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात सायबर गुन्ह्यांविरुद्ध सायबर रक्षकाची फौज अधिक मजबूत होणार आहे.
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच व्हॉट्सॲप, फेसबुक व इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर फसव्या योजनांच्या वाढत्या संख्येला तोंड देण्यासाठी महासायबर सुरक्षा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अहवालानुसार, महाराष्ट्र सायबर सेलला दिवसाला सायबर गुन्ह्यांचे एक हजार कॉल येतात आणि २०२३ पासून सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सायबर कंट्रोल सेंटर उपयुक्त ठरत आहे.
प्रशिक्षित मनुष्यबळ, तज्ज्ञ
एकाच छताखाली जागतिक दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि टुल्स एकत्र आणली असून, त्यात कमांड अँड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशन, सेंटर ऑफ एक्सलन्स, क्लाउड आधारित डेटा सेंटर, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर यांच्यासह प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सायबर तज्ज्ञांचा समावेश आहे. राज्यभरातील सर्व पोलिस आयुक्त, अधीक्षक कार्यालयांमधील सर्व सायबर पोलिस ठाणी या प्रकल्पाशी जोडली आहेत.
तक्रारीसाठी फोन, ॲपद्वारे थेट संपर्क
- १५ ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या या सेंटरमध्ये २४ बाय ७ कार्यरत कॉल सेंटरशी दूरध्वनीद्वारे, तसेच ॲप किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्यांविषयक तक्रार नोंदविता येते.
- गुन्हेगाराला शोधून काढण्यासाठी तसेच शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येत आहे.