मुंबईकरांचे हजारो कोटी नेमके जातात कुठे? तक्रारींचे पाच लाख फोन कॉल
By मनीषा म्हात्रे | Updated: December 30, 2024 15:16 IST2024-12-30T15:14:03+5:302024-12-30T15:16:42+5:30
कोट्यवधींच्या रकमेवर हात साफ करणारे मास्टरमाइंड आजही पडद्याआड आहेत. पोलिस फक्त बँक खाते देणाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत.

मुंबईकरांचे हजारो कोटी नेमके जातात कुठे? तक्रारींचे पाच लाख फोन कॉल
मनीषा म्हात्रे -
मुंबई : सायबर गुन्ह्यांचे संकट दिवसेंदिवस वाढत असून, मागील ११ महिन्यांत सायबर हेल्पलाइनवर तक्रारींचे तब्बल पाच लाख फोन कॉल खणखणले आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा ९१ हजारांवर होता. तर, यंदा ११ महिन्यांत सायबर फसवणुकीची संख्या १ हजार १८१ कोटींवर पोहोचली आहे. कोट्यवधींच्या रकमेवर हात साफ करणारे मास्टरमाइंड आजही पडद्याआड आहेत. पोलिस फक्त बँक खाते देणाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत.
यंदा मुंबईत नोव्हेंबरपर्यंत सायबर फसवणुकीच्या ५५ हजार ७०७ तक्रारींची नोंद झाली. त्यात १ हजार १८१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. त्यातील केवळ १२ टक्के म्हणजे १३९ कोटी १५ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १८ हजार २५६ जणांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांची एकूण २६२ कोटी ५१ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. त्यातील केवळ १० टक्के म्हणजे २६ कोटी ५२ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सायबर फसवणुकीची रक्कम परत मिळवण्याचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले असले, तरी फसवणूक झालेली एकूण रक्कम पाहता त्याचे प्रमाण फार कमी आहे.
१९३० हेल्पलाइन सुरू
सायबर फसवणुकीतील पैसे वाचविण्यासाठी पोलिसांनी १९३० क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. पोलिसांच्या जनजागृतीमुळे या हेल्पलाइनवर तक्रारींची संख्या वाढत आहे. यावर्षी हेल्पलाइनवर पाच लाखांहून अधिक विविध तक्रारीची नोंद झाली. गेल्या वर्षी ११ महिन्यांत या हेल्पलाइनला ९१ हजार तक्रारी आल्या होत्या.
मुंबई पोलिसांचे सायबर कमांडो सज्ज
सायबर गुन्हे कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे सायबर कमांडो सज्ज होत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यातील सायबर अधिकारी व अंमलदार हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करतात. यापूर्वी त्यांना ‘सायबर कमांडो’ म्हणून घोषित करत त्यांचा गौरव करण्यात आला होता. येणारा काळ हा डिजिटलचा आहे.
त्यामुळे पोलिस दलात येणाऱ्या प्रत्येकाला सायबर प्रशिक्षित करण्यासाठी पावले उचलणार आहोत. सायबर गुन्ह्यांमुळे आर्थिक, सामाजिक नुकसान होत आहे. एका चुकीमुळे पैसे जात आहेत.
मात्र, नागरिकांनी न घाबरता तत्काळ १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास पैसे परत मिळू शकतात. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे जात आहेत, ही चिंतेची बाब आहे.
सायबर गुन्हे उघडकीस आणणे व प्रतिबंध करणे, यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. त्यांना अधिक प्रशिक्षण देऊन अधिक कार्यक्षम बनविण्यात येणार असल्याचेही यापूर्वी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले.
६,५०० सिमकार्ड बंद
राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याच्याशी संबंधित साडेसहा हजार अवैध सिमकार्ड पोलिसांनी बंद केले आहेत.