न्यायाधीशांच्या खात्यावर सायबर लुटारूंचा डल्ला; वर्षभरात लाटले सव्वा लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:49 PM2022-02-08T12:49:57+5:302022-02-08T12:51:02+5:30
कुर्ला परिसरात राहणारे ५० वर्षीय तक्रारदार कुर्ला कोर्टात अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आहेत. त्यांच्या बँक खात्याच्या पासबुकवर नोंद झालेले अनेक व्यवहार त्यांनी केले नसल्याचे ३ फेब्रुवारी रोजी लक्षात आले.
मनीषा म्हात्रे -
मुंबई : एका न्यायाधीशांच्या खात्यावरही सायबर लुटारूंनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. गेले वर्षभर हे सायबर लुटारू त्यांच्या पगारावर हात साफ करत होते; पण न्यायाधीश मात्र अनभिज्ञ होते. वर्षभराने ही बाब उघडकीस येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार कुर्ला पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
कुर्ला परिसरात राहणारे ५० वर्षीय तक्रारदार कुर्ला कोर्टात अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आहेत. त्यांच्या बँक खात्याच्या पासबुकवर नोंद झालेले अनेक व्यवहार त्यांनी केले नसल्याचे ३ फेब्रुवारी रोजी लक्षात आले. एटीएम कार्डचा वापर करूनही रक्कम काढण्यात आली होती. हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ
बँकेशी संपर्क साधून कार्ड बंद करण्यास सांगितले.
लुटारूंनी ४ जानेवारी २०२१ रोजी पहिल्यांदा त्यांच्या खात्यातून १० हजार काढले. पुढे ८ जून रोजी २ हजार, १९ जून रोजी ५,६५० व ८ हजार रुपये काढले. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ते २ जानेवारी २०२२ पर्यंत त्यांच्या खात्यातून एकूण १ लाख १९ हजार ३५० रुपये लंपास केले आहेत. या व्यवहारांदरम्यान त्यांनी कुठे, कुठे व्यवहार केले, याचा डाटा काढण्यात आला आहे. प्राथमिक तपासात कार्ड क्लोनिंगद्वारे त्यांचे पैसे काढल्याचा संशय असून, त्यानुसार आरोपीचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी सांगितले.