मुंबई : गुंतवणुकीसाठी शेअर ट्रेडिंगकडे अनेकांचा कल वाढला आहे. मात्र, याच चढाओढीत सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. दिवसाआड शेअर, क्रिप्टो ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची लूट होत आहे. त्याचबरोबर भामट्यांनी डेटिंग ॲपवरूनही शेअर ट्रेडिंगचे जाळे पसरविल्याने चिंतेत भर पडली आहे.
डेटिंग ॲपवरून ओळख करायची. त्यानंतर सावजाला मधाळ संवादात अडकून जास्तीच्या नफ्याचे प्रलोभन दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. याच मोहात मुंबईतील एका व्यावसायिकाने दोन कोटी १४ लाख रुपये गमावले. यापूर्वी डेटिंग ॲपद्वारे ब्लॅकमेल करत खंडणी उकळण्याच्या घटना उघडकीस येत होत्या. मात्र, आता शेअर ट्रेडिंगची वाढती क्रेझ पाहून गुन्हेगारांनी डेटिंग ॲपद्वारेही जाळे पसरविण्यास सुरुवात केली आहे.
२०२ गुन्हे दाखल, २३४ जणांना बेड्या - जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर फसवणुकीच्या सर्वाधिक एक हजार ०८३ घटनांची मुंबई पोलिसांच्या दप्तरी नोंद झाली.- त्यापैकी अवघ्या २०२ गुन्ह्यांची उकल करत २३४ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. - धक्कादायक म्हणजे फसवणूक होणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित, व्यावसायिक मंडळींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सतर्क होत पावले उचलणे गरजेचे आहे.
२० दिवसांत पावणेसहा कोटींचा गंडाएका राष्ट्रीयीकृत बँकेच्या लाइफ इन्शुरन्स विभागात नोकरीला असलेले अधिकारीही सायबर भामट्याच्या शेअर ट्रेडिंगच्या जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये अवघ्या २० दिवसांत त्यांची पावणेसहा कोटींची फसवणूक झाली आहे.
एकाच खात्याचा ४० ते ५० वेळा वापर...- शेअर ट्रेडिंगमधील फसवणुकीसाठी वापरलेल्या एकाच बँक खात्याचा एकाच वेळी देशभरात ४० ते ५० सायबर गुन्ह्यांसाठी वापर होत आहे. पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत आरोपीचा बँक खात्याचा अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. - एनसीसीआर पोर्टलवर या बँक खात्यासंदर्भात देशभरातून ४१ तक्रारीची नोंद झाली आहेत, तर दुसऱ्या प्रकरणात ४५ तक्रारींचा समावेश होता. आतापर्यंत पोलिस आरोपी बँक खातेधारकांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. मात्र, या मागील मास्टरमाइंडचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.