लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नव्या वर्षात मिळालेली जबाबदारी मी नव्या उमेदीने आणि सकारात्मक विचाराने स्वीकारली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असून कोणावर अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास राज्याच्या नवनियुक्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी त्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला. तसेच, महिला सुरक्षा, सायबर आणि कायदा व सुव्यवस्था महत्त्वाचे ध्येय असल्याचेही रश्मी शुक्ला यांनी सांगितले.
केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी ४८व्या पोलिस महासंचालक म्हणून मंगळवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत. फोन टॅपिंग आरोपांतून मुक्तता झाल्यानंतर ४ जानेवारी रोजी त्यांच्या पोलिस महासंचालक नियुक्तीचे आदेश निघाले होते. पोलिस महासंचालक रजनीश सेठ ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता.
- माध्यमांशी बोलताना रश्मी शुक्ला यांनी, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. महिलाही महाराष्ट्रात सुरक्षित असून त्यांची सुरक्षितता आमचे महत्त्वाचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे सायबर क्राइम प्रमुख आव्हानांपैकी एक असून, त्याकडे विशेष लक्ष असेल.
- महामार्गांवर जे अपघात होतात ते रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिस कोणत्याही घटकावर अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच ड्रग्ज, दहशतवादाबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती पावले उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
- पोलिस महासंचालकपदाबाबत विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारताच, मी नव्या वर्षात फ्रेश आणि सकारात्मक विचाराने चार्ज घेत कामाला सुरुवात करत आहे. ३३ वर्षे महाराष्ट्रात काम केले आहे. दोन वर्षे बाहेर होते. आता दोन वर्षांनी पुन्हा घरी परतले आहे. चांगले वाटत असल्याचे सांगितले.