पवई तलाव परिसरातील सायकल ट्रॅक मगरी आणि बिबट्यांच्या मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:07 AM2021-09-23T04:07:24+5:302021-09-23T04:07:24+5:30

मुंबई : पवई तलाव आणि विहार तलावाच्या परिसरात होत असलेल्या बांधकामांना, विशेषत: सायकल ट्रॅकला पर्यावरणवाद्यांनी प्रचंड विरोध दर्शविला असून, ...

Cycle track in Powai Lake area on the roots of crocodiles and leopards! | पवई तलाव परिसरातील सायकल ट्रॅक मगरी आणि बिबट्यांच्या मुळावर !

पवई तलाव परिसरातील सायकल ट्रॅक मगरी आणि बिबट्यांच्या मुळावर !

googlenewsNext

मुंबई : पवई तलाव आणि विहार तलावाच्या परिसरात होत असलेल्या बांधकामांना, विशेषत: सायकल ट्रॅकला पर्यावरणवाद्यांनी प्रचंड विरोध दर्शविला असून, येथील बांधकामांमुळे तलाव आणि परिसरातील जैवविविधता नष्ट होईल. शिवाय, येथील मगरी आणि बिबट्यांनादेखील बाधा पोहोचेल, अशी भीती व्यक्त करत हे काम थांबविण्यात यावे, असे म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पवई तलाव, विहार तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले जात आहे. विशेषत: पवई तलाव परिसरात सायकल ट्रॅकसाठीचे बांधकाम केले जात आहे. मात्र, येथील अशा प्रकारच्या बांधकामांना पर्यावरण क्षेत्रात कार्यरत अभ्यासकांनी विरोध दर्शविला आहे.

पर्यावरण अभ्यासक सुशांत बळी यांच्या म्हणण्यानुसार, सायकल ट्रॅकच्या कामामुळे येथील पर्यावरणाची हानी होईल. मुळात पवईत तलावात मोठ्या प्रमाणावर मगरी आहेत आणि येथील बांधकाम अगदी तलावाला लागून केले जात आहे. शिवाय, परिसरात बिबट्यांचा वावरदेखील असतो. या कामांचा मगरी आणि बिबट्यांना फटका बसेल. केवळ बिबट्या आणि मगरी नाही, तर उर्वरित जैवविविधतादेखील नष्ट होईल. यातून काहीएक साध्य होणार नाही, तर उलटपक्षी आपण पर्यावरणाची हानी करत आहोत.

येथे काम करत असलेल्या कंत्राटदाराला आम्ही कामाबाबत कित्येक वेळा विचारणा केली. वेळप्रसंगी पोलीस ठाणे गाठले. मात्र, महापालिका कामाबाबत नीट माहिती देत नाही. झाडे तोडली जाणार हा वेगळाच भाग आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत नीट माहिती कोणी देत नाही. प्रकल्पस्थळी दाखल झाल्यानंतर कंत्राटदाराला काही माहिती नाही किंवा संबंधितांकडून माहिती दिली जात नाही. जेव्हा आरेमध्ये मेट्रोचे काम सुरू होते, तेव्हादेखील आमचे हेच म्हणणे होते की, पर्यावरणाची हानी करू नका. जंगलांच्या ठिकाणी बांधकामे करू नका. आतादेखील आमचे हेच म्हणणे आहे की, अशी बांधकामे करून आपण पवई तलावाला, येथील जैवविविधतेला हानी पोहोचवत आहोत.

पर्यावरण अभ्यासक अमृता भट्टाचार्य यांच्या म्हणण्यानुसार, अशा बांधकामांनी येथील पर्यावरणाची हानी होणार आहे. भराव टाकून बांधकाम करणे हे योग्य नाही. मुळात अशा कामांच्या नावाखाली कोणती कामे केली जात आहेत? हे कळायला मार्ग नाही. जैवविविधता नष्ट करून विकास होताच कामा नये. अशा विकासाला कोणाचेच समर्थन राहणार नाही. त्यामुळे महापालिका असो, सरकार असो वा वनविभाग असो; या प्राधिकरणांनी येथील जैवविविधेता, पर्यावरणाचा विचार करत अशा बांधकामांना स्थान देता कामा नये.

दरम्यान, येथील सायकल ट्रॅकमुळे तलावांतील मगरींना मोठी हानी पोहोचणार आहे. कारण, येथील काही भराव अशा ठिकाणी होत आहेत, जेथे मगरींचे अंडी घालण्याचे ठिकाण आहे. शिवाय, बिबट्याचादेखील या परिसरात वावर असतो. त्यामुळे त्यालादेखील हानी पोहोचणार आहे. त्यामुळे येथील बांधकाम थांबविण्यात यावे, अशा आशयाची मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.

Web Title: Cycle track in Powai Lake area on the roots of crocodiles and leopards!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.