अक्षय देशपांडे, सायकलप्रेमी
कॉम्प्युटर विश्वात जगभरात ज्यांच्या नावाचा दबदबा होता, अशा अवतार सैनी यांचा गेल्या आठवड्यात सायकल चालवत असताना एका टॅक्सीने उडविल्यामुळे मृत्यू झाल्याची बातमी आपण सर्वांनी वाचली. भयावह गोष्ट म्हणजे, त्यांच्या सायकलला धडक बसल्यानंतर टॅक्सी चालकाने त्यांना वाचविण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत, उलट त्यांना पुढे खेचतच नेले. धक्कादायक, दुःखद आणि आपल्या सर्वांना फार विचार करायला लावणारी, अशी ही बातमी आहे, असे मला वाटते. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी सायकल प्रेमींच्या ग्रुपवरही धडकली आणि मग विविध अंगाने चर्चा झाली.
प्रत्येकाला आपण रोज सायकलिंग करताना येणाऱ्या अनुभवाची जाणीव तीव्र झाली आणि मनात भीती दाटून आली, हे नक्की. एका निष्णात सायकलस्वाराच्या मृत्यूनंतर सायकलस्वार आणि सध्याची वाहतूक स्थिती यानिमित्ताने मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुळात सायकल ही मुंबईच्या संस्कृतीचा एक जुना अविभाज्य भाग आहे. दूधवाले, डब्बेवाले, विविध प्रकारचे सामान पोहोचविणारे लोक, शाळेत जाणारी मुले असे कित्येक जण रोज सायकलचा वापर करतात. जेव्हा आपण सायकलप्रेमी पाहतो तेव्हा आपल्याला त्यांच्या आकर्षक सायकलप्रमाणेच त्यांचे रंगीत फ्लोरोसंटचे कपडे, हेल्मेट, शॉटस्, चष्मा यांचेही आकर्षण वाटते.
फ्लोरोसंट रंगाचे कपडे हे पाहणाऱ्याला कदाचित गमतीशीर वाटतील, पण ते मुद्दाम तसे आहेत. कारण रस्त्यावरील इतर वाहकांमध्ये ते उठून दिसावेत, हा विचार त्यामागे आहे. तसेच, सायकलच्या पुढे व मागे देखील लाईट्स असतात. त्यांची उघडझाप देखील सातत्याने होत असते. सोपा मुद्दा असा की, बाजूने जाणाऱ्या वाहनाला आपल्या बाजूने सायकल जात आहे, याची पुरेपूर जाणीव यामुळे होते. फक्त, सायकलला आरसे नसल्यामुळे सायकलस्वारांना मागचे दिसत नाही. त्यामुळे ते त्यांच्या अंदाजाने सायकल चालवित असतात.
आता मुद्दा रस्त्यावरून जेव्हा प्रत्यक्षात सायकल चालवली जाते त्याचा. आपल्या पुढे सायकलस्वार आहे हे दिसले की, त्याच्या बाजूने किमान ५ ते १० फूट अंतर सोडून माेठे वाहन चालवले तर सायकलस्वाराला धोका पोहोचणार नाही. हाय-वे, उड्डाणपूल या सर्व ठिकाणी डाव्या बाजूच्या अगदी टोकाला ड्रेनेजच्या लाईन्स असतात. त्याही उतरंडीच्या रचनेत असतात. अशावेळी एका बाजूला ड्रेनेज लाईन आणि दुसऱ्या बाजूला वेगाने जाणारी वाहने यामुळे सायकलस्वार कोंडीत सापडला जाऊ शकतो व अपघाताचे प्रमाण बळावते.
आजच्या घडीला युरोपातील १० पैकी प्रमुख ९ शहरे ही सायकलप्रेमींची शहरे म्हणून ओळखली जातात. तेथील एकूण वाहतूक व्यवस्थेत सायकल वापराचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. सायकलींसाठी राखीव मार्गिका हा तेथील अविभाज्य घटक आहे. आज ज्या प्रमाणात लोक सायकलचा वापर करत आहेत ते पाहता, दिवसातले काही तास त्यांच्यासाठी एक मार्गिका राखीव का ठेवली जात नाही, याचा देखील विचार होणे गरजेचे वाटते.