मुख्य प्रकल्पाची हानी नाही; स्थिती पूर्ववत होण्यास लागणार दहा दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या शिवडी न्हावा शेवा म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला तौक्ते चक्रीवादळाचा किंचित फटका बसला. येथील प्रकल्पाच्या मुख्य बांधकामची हानी झाली नसली तरी तात्पुरत्या कामासाठी उभारलेल्या पुलाला सुमारे ३८ बोटी धडकल्या. पुलाचे रोलिंग तुटले. याशिवाय मोठी दहा ते बारा जहाजे प्रकल्पाच्या आसपास दाखल झाली. सुदैवाने मुख्य प्रकल्पास मोठी हानी झाली नसली तरी येथील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी किमान आठवड्याहून जास्त दिवसांचा कालावधी लागणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त आर. ए. राजीव यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, कोळी बांधवांच्या ३८ बोटी येथे धडकल्या आहेत. याव्यतिरिक्त १० ते १२ मोठी जहाजे येथे दाखल झाली आहेत. वाऱ्याच्या वेगाने १०० ते १५० मीटरवरून बोटी येऊ धडकल्या आहेत, तर मोठी जहाजे दहा किलोमीटर अंतर म्हणजे गेट वे ऑफ इंडियाहून धडकली आहेत. सदर पुलाचे काम करण्यासाठी तात्पुरता जो पूल उभारला होता, त्याचेही काही प्रमाणात नुकसान झाले. रेलिंग तुटले. शिवाय येथे उभारलेली काही छोटी बांधकामे, शौचालये तुटली. याची दुरुस्ती करण्यास काही वेळ लागेल. सुदैवाने इतर बांधकामांना किंवा मुख्य प्रकल्पाला काही बाधा झालेली नाही. मुख्य बांधकाम किंवा खांबांना हानी पोहोचलेली नाही. कामाला १ आठवडा १० दिवसांचा विलंब होईल. आता येथील बोटी काढण्यासाठी बोटीच्या मालकांशी संपर्क साधला जात आहे. १ आठवडा १० दिवसांत हे काम होईल.
----------------
सी-लिंकवरील वाहतूक सुरू
अरबी समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे सुरक्षेच्या कारणात्सव वांद्रे - वरळी सी लिंकवरील वाहतूक तीनएक दिवस बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता वादळाचा आणि पावसाचा जोर ओसरल्यानंतर मंगळवारी दुपारी सी लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
----------------
मोनो रेल सुरू
मुंबईत चक्रीवादळामुळे वेगाने वारे वाहात होते. परिणामी चेंबूर - वडाळा - संत गाडगे महाराज चौकदरम्यान धावणारी मोनोरेल सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, मंगळवारी पावसाचा आणि चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर मोनोरेल सुरू करण्यात आली, असे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले.