Join us  

तौक्ते चक्रीवादळाचे अरबी समुद्रात २२ बळी, ६५ जणांचा शाेध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:06 AM

प्रतिकूल परिस्थितीत नौदल, तटरक्षक दलाच्या जवानांचे शाेध व बचाव कार्य नेटाने सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रचंड वेगाने ...

प्रतिकूल परिस्थितीत नौदल, तटरक्षक दलाच्या जवानांचे शाेध व बचाव कार्य नेटाने सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रचंड वेगाने वाहणारे वारे, २० ते २५ फूट उंचीच्या लाटा आणि खराब हवामानामुळे शुन्यावर आलेली दृश्यमानता अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय नौदल, तटरक्षक दलाच्या जवानांनी अरबी समुद्रातील मुंबई हाय परिसरात शोध आणि बचावकार्य नेटाने सुरू ठेवले. तौक्ते चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या विविध बार्ज आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले आहे. यातील, पी-३०५ या दुर्दैवी बार्जवरील २७३ पैकी १८६ जणांची सुटका करण्यात आली असून, २२ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर उर्वरित ६० ते ६५ जणांचा शोध अद्याप चालू आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे उधाणलेल्या समुद्रात पी-३०५ या बार्जवरील (कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय असणारी मोठी तराफा) वरील २७३ जणांचा जीव धोक्यात आला होता. याशिवाय, गॅल कन्स्ट्रक्टरवर १३७, ‘सागरभूषण’वर १०१, तर एस. एस. -३ वर १९६ जण अडकून पडले होते. दोन दिवसांपासून नौदल आणि तटरक्षक दलाकडून ओएनजीसीसह शोध आणि बचावकार्य सुरू आहे. पी-३०५ वगळता अन्य ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात यंत्रणांना यश आले आहे. आपत्तीग्रस्त पी-३०५ मधून सुखरूप बाहेर पडलेल्या १८६ कर्मचाऱ्यांसह आयएनएस कोची ही युद्धनौका आज नौदल गोदीत दाखल झाली. तर, तब्बल २२ जणांचे मृतदेह बचाव पथकांच्या हाती लागले आहेत. अद्याप ६० ते ६५ जणा बेपत्ता असल्याची माहिती असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती नौदलाच्या जनसंपर्क विभागाने दिली. अद्याप बचावकार्य सुरु असून, बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. आम्ही अद्याप आशा सोडली नाही. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतसा कर्मचाऱ्यांची वाचण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली.

भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची, आयएनएस कोलकत्ता, आयएनएस तलवार या युद्धनौकांसह बेतवा, तेग, बिआस ही जहाजे पी-८१ विमानासह सी-किंग हेलिकाॅप्टर्स या बचावकार्यात गुंतली आहेत. याशिवाय, तटरक्षक दलाच्या सम्राट, अन्य जहाजे आणि चेतक हेलिकाॅप्टर्ससह खासगी संस्थांकडून मदतकार्यासाठी लागणारी टोईंग आणि अन्य जहाजे या कामात वापरण्यात येत आहेत.

* चाैकशीसाठी समिती गठीत

तौक्ते चक्री वादळाच्या धोक्याची पूर्वसूचना असतानाही इतक्या संख्येने कर्मचारी समुद्रातच कार्यरत राहिल्याने आश्चर्य तसेच संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी शिपिंग महासंचालक अमिताभ कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत संरक्षण विभागासह संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

............................