मुंबई - उद्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगड जिल्ह्याला भेट देणार होते मात्र हा दौरा आता रद्द करण्यात आला आहेसध्या निसर्ग चक्रीवादळामुळे प्रशासन हे पंचनामे व इतर मदत कार्यात व्यस्त आहे. आपदग्रस्तांना अनुदान वाटप, साहित्य वाटप यापूर्वीच सुरू झाले आहे. हे मदत कार्य अधिक वेगाने होणे महत्त्वाचे असल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी कोकणचा दौरा केला होता, निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली होती. निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित व्यक्तींना सर्व नियम बाजूला ठेवून शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली होती. मुख्यमंत्री म्हणाले होते की, नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तत्पूर्वी रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदुर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसानभरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला दिल्या होत्या, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते
चक्रीवादळाने रायगड-रत्नागिरीमध्ये विजेचे खांब कोसळले आहेत, ते उभारण्याचे काम सुरू आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर जिल्ह्यांतील तांत्रिक मनुष्यबळ तिथे नियुक्त केले आहे. येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.