Cyclone Nisarga: ...अन् बीकेसीच्या कोरोना रुग्णालयातील मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 06:34 PM2020-06-03T18:34:34+5:302020-06-03T18:35:54+5:30
Cyclone Nisarga: मुंबईवरील चक्रीवादळाचं संकट दूर; चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं
मुंबई: राज्यावरील संकटांची मालिका संपण्याची चिन्हं नाहीत. आधीच कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या महाराष्ट्रावर सध्या निसर्ग चक्रीवादळाचं संकट आहे. कोरोनाचा सामना करणारी राज्यातली जनना, प्रशासन आता चक्रीवादळाला तोंड देत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला. तसंच नुकसान निसर्ग चक्रीवादळामुळे होतं की काय, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र हे संकट शहरापासून दूर गेल्यानं धोका जवळपास टळला आहे.
मुंबईच्या अनेक भागांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू होता. त्यानंतर सोसाट्याचा वारादेखील सुरू झाला. दुपारी एक वाजता अलिबागच्या किनाऱ्यावर धडकलेलं निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं सरकरण्याची शक्यता निर्माण झाली. वांद्रे-कुर्ला संकुलात उभारण्यात आलेल्या कोरोना रुग्णालयात गळती सुरू झाली. त्यातच काही भागांमध्ये पाणीदेखील साचू लागलं. मात्र चक्रीवादळाचा धोका ओळखून इथल्या रुग्णांना कालच इतरत्र हलवण्यात आल्यानं अनर्थ टळला. भर पावसात या रुग्णांना इतरत्र हलवणं अतिशय जोखमीचं ठरलं असतं.
अलिबागला दुपारी १ वाजता धडकलेलं चक्रीवादळ सध्या ठाणे जिल्ह्यात आहे. मुंबईपासून हे वादळ दूर गेलं असलं तरी रात्रीपर्यंत अलर्ट कायम आहे. चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकू लागलं आहे. नाशिक, मालेगाव, नंदुरबारला आता चक्रीवादळाचा धोका आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या गुजरातच्या जिल्ह्यांनादेखील रेट अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई, ठाणे, पुण्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.