मुंबई: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्ट्यामुळे येणाऱ्या वादळाचं चक्रीवादळात रूपांतर होऊन ते महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे.
राज्याच्या किनारपट्टीवर आज निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. आज अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एनडीआरएफसह नौदलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र प्रशासनासोबत नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या परिस्थितीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
चक्रीवादळाच्या परिस्थितीत पुढील गोष्टी करा-
- घरातील रेडिओ किंवा टिव्हीवर निसर्ग वादळाची माहिती किंवा अपडेट्स जाणून घ्या.
- मोबाईल वैगरे चार्ज करुन घ्या.
- घरातील फरश्या, खिडक्या, दरवाजे खराब स्थितीत असतील तर त्याचापासून सावध राहा.
- जर तुमचं घर असुरक्षित ठिकाणी असेल तर नुकसानीचं प्रमाण कमी करण्यासाठी मौल्यवान आणि इतर वस्तू वरच्या मजल्यावर ठेवा.
- धोकादायक इमारतींपासून सतर्क राहा.
- मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्या.
- वाहन चालवताना काळजी घ्या.
- सध्या कोरोनाचं संकट असल्यामुळे शक्यतो फिजिकल डिस्टन्सिंग पाळा. प्रशासनाने कुठे सुरक्षित स्थळी तुम्हाला हलवलं असेल तर तिथेही गर्दी टाळा.
चक्रीवादळाच्या परिस्थितीत पुढील गोष्टी करु नका-
- अफवांवर विश्वास ठेऊ नका.
- रस्त्यावरील विजेच्या खांबांना लटकणाऱ्या वायर, तारा यांना स्पर्श करू नका.
- आपत्ती विभागातील कर्मचारी जोपर्यत सुरक्षित निवारा सोडण्यास सांगत नाही तोपर्यत ते सोडू नका.
- व्हॉट्सअॅपवर आलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. चक्रीवादळाबाबत वेळोवेळी सरकारी यंत्रणांकडून माहिती दिली जाईल. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवून घराबाहेर पडू नका.