मुंबई – राज्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळेकोकणातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. अनेक झाडे, फळबागा कोसळल्या असून राहत्या घरांचे छप्परही उडून गेल्यानं लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. कोकणात चक्रीवादळानंतर जी परिस्थिती तयार झाली, त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी तिथे भेट दिली, माझ्या दौऱ्यातून जे सत्य बाहेर आले ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडले, एक रुपयाची मदतही लोकांपर्यंत पोहचली नाही, सरकारचं कुठेही अस्तित्व दिसत नाही असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, लोकांना ज्या शाळांमध्ये ठेवलं आहे तिथे काहीच सुविधा नाहीत, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करतानाही दिसत नाहीत, अत्यंत विदारक चित्र समोर आलं, लोकांना तात्काळ रोख पैसे मिळाले पाहिजेत, कोकणात विजेचा पुरवठा पुन्हा लवकर सुरळीत करा, मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांचा डिझेलचा परतावा तात्काळ परत करावा. ज्या बोटींचे नुकसान झालं आहे त्यांना मदत करा, मच्छिमारांचे कर्ज माफ कराव अशा विविध मागण्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या.
तसेच छोटे स्टॉलधारकांना कोणतीही मदत झाली नाही, त्यांनाही मदत करावी लागेल. एमटीडीसीच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यात यावी, कर्जामध्ये सूट देण्यात यावी, घरपट्टी स्थगित करावी, ५० हजार रुपये हेक्टरी ही मदत तोकडी आहे. लोकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. १०० टक्के अनुदानात फळपिकांची योजना लागू करण्यात यावी, त्यामुळे ज्या बागा नष्ट झाल्या आहेत त्या पुन्हा उभारता येतील, जी झाडं कोसळली आहे ते साफ करण्यासाठी जी मदत दिली त्यापेक्षा जास्त खर्च आहे. ही झाडं तात्काळ साफ करण्यात यावी जेणेकरुन त्याठिकाणी रोगराई पसरणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
त्याचसोबत बेघरांना पुन्हा घर बांधेपर्यंत १ वर्ष त्यांना घराच्या बाहेर राहावं लागणार आहे त्यांना घराचं भाडं देण्यात यावं, केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज आणलं आहे त्यात फळबागा, मच्छिमारांसाठी अनेक योजना आणल्या आहेत, त्याचा वापर कोकणासाठी करावा याबाबत राज्य सरकारने प्रयत्न करावेत, ११ दिवसानंतर कोकणात प्रत्यक्ष जमिनीवर सरकारचं अस्तित्व दिसत नाही त्यासाठी सरकार प्रयत्न करेल ही अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे दर ५० टक्क्यांनी कमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
चिंताजनक! राज्यातील १ कोटी ६६ लाख विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार?
राज्य सरकारनं सत्य सांगावं, सर्वसामान्यांना त्रास होतोय; भाजपा खासदाराचा गंभीर आरोप
हिंद महासागरात वेगाने पसरतोय ड्रॅगन; येणाऱ्या काळात भारतासाठी मोठं टेन्शन!
कोरोनापाठोपाठ चीनवर कोसळलं नवं संकट; लाखो लोकांचा जीव धोक्यात तर अनेक जण बेपत्ता!