Cyclone Tauktae Alert Maharashtra: सलग दुसऱ्या वर्षी किनारपट्टीवर संकट! तौत्के चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कुठे अन् काय परिणाम होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:59 AM2021-05-15T09:59:15+5:302021-05-15T10:16:56+5:30
Cyclone Tauktae Alert Maharashtra: रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागांमध्ये शुक्रवारी संध्याकाळपासून पाऊस पडत असल्याचं चित्र आहे.
मुंबई: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळमहाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या तौत्के चक्रीवादळाने वेग पकडल्याची माहिती हवामान खात्यानं सांगितली आहे. तसेच हे चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे.
तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील किनारपट्टी भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनाही त्याबाबत आवाहन केलं जात आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागांमध्ये शुक्रवारी संध्याकाळपासून पाऊस पडत असल्याचं चित्र आहे. तर, रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वातावरण ढगाळ असून विजा चमकत असल्याचं रात्रीचं चित्र होतं. अद्याप देखील सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं नसून समुद्रामध्ये हळूहळू लाटा उसळत आहेत. पुढील दोन दिवस कोकणाकरता महत्त्वाचे असून निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव पाहता चक्रीवादळाचं संकट टळू दे, अशी अपेक्षा सध्या प्रत्येक कोकणवासी बोलून दाखवत आहे.
#WeeklyDigest (May 10-14, 2021): Top #Weather, #Science and #Coronavirus Stories of the Weekhttps://t.co/ETfHsie4O0pic.twitter.com/Aw77dd3aFP
— The Weather Channel India (@weatherindia) May 15, 2021
भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. १६ मे रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ७० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. १७ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १८ मे रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सुचना प्रशासनास दिल्या. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असेही उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीत सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.
तौत्के चक्रीवादळाचा राज्यात कुठे होणार परिणाम-
कोकण – मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाऱ्याची शक्यता
पालघर आणि रायगड – मोठा पाऊस
मुंबई, ठाणे – पावसाच्या हलक्या सरी
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा- तुरळक पाऊस
विदर्भ – मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट